Navnath Bhaktisar Adhyay 30

Navnath Bhaktisar Adhyay 30 is the thirtieth chapter of the book. If a thief steals something from the reader, he/she would become blind.

Navnath Bhaktisar Adhyay 30:

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी जगदुद्धारा ॥ पंढरीअधींशा रुक्मिणीवरा ॥ सर्वसाक्षी दिगंबरा ॥ पुढें ग्रंथ बोलवी कां ॥१॥ मागिले अध्यायीं अनुसंधान ॥ भर्तरीस आले विरक्तपण ॥ गोरक्षजतीचे समागमें करुन ॥ गिरनार अचळा पोंचला ॥२॥ पोंचला परी रात्रदिन ॥ लेऊनि स्नेहाचें अपार रत्न ॥ तेणेंकरुनि उभयतां जाण ॥ सुशोभित पैं झालें ॥३॥ यावरी गोरक्ष तीन रात्री ॥ राहता झाला गिरनारपर्वती ॥ मग पुसूनी श्रीदत्ताप्रती ॥ मच्छिंद्राकडे चालिला ॥४॥ चालिला परी अत्रिसुत ॥ म्हणे बाळा गोरक्षनाथा ॥ मच्छिंद्रवत्स मम देहातें ॥ भेटला नाहीं बहुत दिवस ॥५॥ तरी तयाचे भेटी माझे चक्षु ॥ परम भुकेले योगदक्षु ॥ तरी त्या आणूनि मज प्रत्यक्षु ॥ भेटवीं कां जिवलगा ॥६॥ ऐसी ऐकतां दत्तात्रेयवाणी ॥ भेटवीन म्हणे गोरक्षमुनी ॥ मग श्रीदत्तात्रेयचरणां नमूनी ॥ निघता झाला गोरक्ष ॥७॥ श्रीमच्छिंद्रनाथमार्ग धरुन चालता झाला गोरक्षनंदन ॥ येरीकडे रायाकारण ॥ काय करी महाराजा ॥८॥ नाथदीक्षा देऊनि त्यासी ॥ मौळीं स्थायीं वरदहस्तासी ॥ चिरंजीवपद देऊनि त्यासी ॥ अक्षय केला महाराजा ॥९॥ जोंवरी कल्याण असे धरित्री ॥ चिरंजीव केला राव भर्तरी ॥ ऐसें वचन वागुत्तरीं ॥ प्रसादाते ओपिलें ॥१०॥ याउपरी अभ्यासास ॥ प्रारंभी नेमिला भर्तरीदास ॥ ब्रह्मज्ञान रसायनास ॥ कविता वेद सांगितला ॥११॥ ज्योतिष व्याकरण धनुर्धर ॥ जलतरणादि संगीतोत्तर ॥ वैद्य अश्व रोहिणी अपार ॥ गाढ आधींच होता तो ॥१२॥ कोकशास्त्रादि नारक – कळा ॥ चातुर्थभाष्य बोल रसाळा ॥ मीमांसादि पातंजला ॥ प्रवीण केला महाराजा ॥१३॥ यापरी वैद्यशास्त्र गहन ॥ सांगता झाला अत्रिनंदन ॥ वातास्त्रादिक जलद पूर्ण ॥ अग्निअस्त्र सांगितलें ॥१४॥ कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण ॥ वज्रास्त्र पर्वतास्त्र वासवशक्ति दारुण ॥ नागास्त्र खगेंदास्त्र अस्त्रजीवनीं जीवन ॥ ब्रह्मास्त्रादि उपदेशी ॥१५॥ देवास्त्र काळास्त्र आणि मोहन ॥ रुद्राक्ष विरक्तास्त्र आते निपुण ॥ निर्वाण अस्त्रादि दानवप्रवीण ॥ रतवनास्त्रादि सांगितली ॥१६॥ कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र ॥ विभक्तास्त्रादि मानवअस्त्र ॥ विहंगम प्लवंगम कामिनीअस्त्र ॥ सकळ अस्त्रादि उपदेशी ॥१७॥ यावरी शस्त्रविद्या सघन ॥ पूर्वी होता राव निपुण ॥ त्रिशूळ फरश अंकुश मान ॥ धनुष्य तोमर असिलता ॥१८॥ परज मुदगर बरसी ॥ मांडूक चक्रें गदा उद्देशीं ॥ दारुकयंत्रे शस्त्रेंसीं बरसी ॥ कुठारादिकीं प्रवीण ॥१९॥ ऐसा शस्त्रविद्येकारण ॥ पूर्वीच होता राव प्रवीण ॥ त्यावरी अस्त्रविद्यारत्न ॥ गुरुमुखें लाधला ॥२०॥ मग ते विद्येसी अर्थ शेवटीं ॥ कीं कोंदण विराजे रत्नतगटी ॥ मग त्या हेमावटी ॥ मोल काय बोलावें ॥२१॥ कीं सुगंधित मलयागार ॥ त्या मिश्रित झालें मृगमदकेशर ॥ मग त्या गंधातें वागुत्तर ॥ कवण अर्थी बोलावें ॥२२॥ असो विद्यासंपन्न ॥ भर्तरीतें करुनि अत्रिनंदन ॥ उपरी साबरी व्यक्त करुन सदनातें पाठवी ॥२३॥ नाग पन्नग उभय ठायीं ॥ सकळ दैवतें तया प्रवाहीं ॥ मित्र कुंडासनीं वेढूनी महीं ॥ पाठवीत महाराजा ॥२४॥ मग तेथें जाऊनि भर्तरीनाथ ॥ साधिलें सकळ बावन्न वीरांतें ॥ जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत ॥ त्याचि क्लेशा वरियेलें ॥२५॥ मग सकळ देव करुनि प्रसन्न ॥ पाहती श्रीगुरुचे चरण ॥ मग सवें घेऊनि अत्रिनंदन ॥ बद्रिकाश्रमीं पातला ॥२६॥ तेथें बैसवूनि पूर्ण तपासी ॥ मग घेऊनि गिरनारपर्वतासी ॥ राहते झाले सुखवस्तीमी ॥ मच्छिंद्रमार्ग विलोकीत ॥२७॥ तों येरीकडे गोरक्षनाथ ॥ पहाता झाला गर्भगिरी पर्वत ॥ परम आवडीं आनंदभरित ॥ मच्छिंद्रातें भेटला ॥२८॥ उपरी चरणीं ठेवूनि माथां ॥ म्हणे महाराजा आनंदभरिता ॥ तुमच्यां भेटीची क्षुधा नितांत ॥ कामानळू दाटला ॥२९॥ तरी तयाची घेऊं भेटी ॥ आनंदें होड दाटला पोटीं ॥ जैसी इंदूची अर्णवा गांठी ॥ प्रेमें लहरी उचंबळे ॥३०॥ कीं सोमातें कुमुदपती ॥ भेटी चुंबक काम वांच्छिती ॥ तन्न्यायें त्रिविधमूर्ती ॥ कामिनली भेटसी ॥३१॥ ऐसी गोरक्षकाची ऐकतां वाणी ॥ तोहि पडला कामवेष्टणी ॥ म्हणे वत्सा माझा स्वामी ॥ पाहूं ऐसें वाटतसे ॥३२॥ मग कांहीं दिवस तेथें राहून ॥ करिते झाले उभय गमन ॥ वैदर्भदेशींचा मार्ग धरुन ॥ गमत असती उभयतां ॥३३॥ तों कौंडिंण्यपुरीं सहज ग्रामांत ॥ करुं गेले उभय भिक्षेतें ॥ तों तेथींच शशांगर नृपनाथ ॥ कोपलासे स्वसुता ॥३४॥ कोपला परी चौहटआंत ॥ दूताहातीं ओपूनी सुत ॥ खंडित करुनि पदहस्त ॥ चौहटातें टाकिला ॥३५॥ यावरी श्रोते कल्पना घेती ॥ राव कोपला सुतावरती ॥ तो कोप तया कवण अर्थी ॥ सुतावरी पेटला ॥३६॥ तरी हे कविज्ञ महाराजा ॥ दावा सकळ निर्णयचोजा ॥ गूढत्व ठेवूनि ग्रंथी भोजा ॥ प्रांजळपणीं असावा ॥३७॥ ऐसें ऐकतां श्रोत्यांचें वचन ॥ कवि म्हणे घ्या अनुसंधान ॥ तेथींचा राव शशांगर नाम ॥ प्रज्ञावंत धार्मिक ॥३८॥ धैर्य औदार्य बाळ संपत्तीं ॥ सत्वस्थ यश करी कांतीं ॥ ऐसा असूनि शशांगर नृपती ॥ परी संतति नसे त्या ॥३९॥ संतति नसे तेणेंकरुन ॥ राव पेटला चित्तीं उद्विग्न ॥ न आवडे वैभव राज्यकारण ॥ छत्रसिंहासन नावडे ॥४०॥ नावडे आसन वसन शयन ॥ नावडे अन्नोदकादि पान ॥ नावडे चातुर्यभोगादि गायन ॥ कळाकुशळ गुणस्वी ॥४१॥ सदा विराजूनि एकांतस्थानीं ॥ वंशलतेची करी घोकणी ॥ तों एके दिवशीं मंदाकिनी ॥ कांता बोले रायातें ॥४२॥ म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा ॥ धाक धरितां संततिकामा ॥ परी लल्लाटरेषेच्या विधिउपमा ॥ नसल्या व्यर्थ कां धाक ॥४३॥ तरी सर्वज्ञा सहजस्थितीं ॥ चित्त मिरवा प्रांजळवृत्तीं ॥ व्यर्थ कांचणी शरीराप्रती ॥ न भंगूं द्यावें अनलातें ॥४४॥ राया वडवानळ चिंताक्लेश ॥ शरीरा साहूनि हरी प्रज्ञेस ॥ प्रज्ञेविण संसार ओस ॥ होत आहे महाराजा ॥४५॥ ऐसें बोलतां मंदाकिनी ॥ परी राया बोध न वाटे मनीं ॥ चित्तदरीं व्यग्र कांचणी ॥ संसारवल्ली सोडीन ॥४६॥ दिवसानुदिवस अति थोर ॥ नावरे चिंतावैश्वानर ॥ मग एके दिवशीं अति निष्ठुर ॥ शिव आराधूं बैसला ॥४७॥ मंत्रिकातें पाचारुन ॥ वैभव केलें त्यां स्वाधीन ॥ सवें स्वल्प दूत घेऊन ॥ दक्षिण दिशे चालिला ॥४८॥ रामेश्वरा काम वरुन ॥ जात शिवातें करुं प्रसन्न ॥ तों मार्गी चालतां कृष्णासंगम ॥ तुंगभद्रीं भेटला ॥४९॥ तेथें राहता मुक्कामासां ॥ शयन करितां निशीसी ॥ दशकर पंचानन स्वप्नासी ॥ येऊनिया बोलतसे ॥५०॥ म्हणे राया संसारवल्ली ॥ तव चिंतदरीं चिंत्ता व्यापिली ॥ तरी याचि ठायीं संतानवल्ली ॥ प्राप्त होईल तुज राया ॥५१॥ परी कृष्णातुंगभद्रा उभयसरितीं ॥ संगम चिमट्यांत तटक्षिती ॥ अपर्णेसहित माझी मूर्ती ॥ नित्य अची त्या लिंगी ॥५२॥ लिंग अर्चिता सकाम कामा ॥ स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा ॥ याविण खंती जावया तुम्हां ॥ अन्य उपाय नसेचि ॥५३॥ ऐसा स्वप्नी दृष्टांत होतां ॥ तेंचि आवडे नरेशचित्ता ॥ मग मित्रडोहसंगमसरिता ॥ जाऊनियां विलोकी ॥५४॥ तों जुनाट लिंग दिसलें तेथ ॥ होतें तटीं प्रतिष्ठेरहित ॥ रावें पाहूनि सप्रेमभरित ॥ प्रतिष्ठेंत मिरविलें ॥५५॥ मेळवूनि पंचोपचारक ॥ तया उभवूनि प्रेम दोंदिक ॥ प्राणप्रतिष्ठा करुनि आरचक ॥ तया ठायीं मिरवला ॥५६॥ तयालागीं उत्साह थोर ॥ भावने रक्षी रामेश्वर ॥ परी कीर्तिध्वजे संस्कार ॥ अपार लोक मग येती ॥५७॥ करुनि हराचे जयजयकार ॥ अखंड होता नामीं गजर ॥ जय जय शिव संगमेश्वर ॥ ऐसें लोक बोभाती ॥५८॥ परी तयानिकट मध्यक्षिती ॥ भद्रसंगम ग्रामवस्ती ॥ तयामाजी भूदेव जाती ॥ एक असे प्राज्ञिक ॥५९॥ मित्राचार्य तयाचें नाम ॥ वेदपाठकी उत्तमोत्तम ॥ तयाचि दारा शरयू नाम ॥ पतिव्रता आगळीं ॥६०॥ आगळी परी संततीविण ॥ दोघे होती अति क्षीण ॥ मग ते उभयतां सुलक्षण ॥ त्याच शिवा अर्चिती ॥६१॥ ऐसें लोटतां काहीं दिवस ॥ तों स्वर्गी वर्तलें काय कथेम ॥ सर्व गण मिळूनि सभेस ॥ शिवा बैसले वेष्टुनी ॥६२॥ सुधाम अति मनोहारक ॥ रत्नजांडत तें हाटक ॥ तरी धाम नोहे वेडूर्यविकासिक ॥ शिवसभा मिरवतसे ॥६३॥ ऐसिये सभे ते काळीं ॥ बैसली असतां गणमंडळी ॥ सुरोचना अप्सरा चंद्रमौळी ॥ पाचारिता पैं झाला ॥६४॥ तंव ती सुरोचना देवांगना ॥ वेगीं येऊनि सिद्धांगणा ॥ मदनांतकाच्या लागूनि चरणा ॥ नाट्यपरी वहिवटली ॥६५॥ नाट्यें करितां चातुर्यगायन ॥ चतुर्थ स्वरीं परम संपूर्ण ॥ तानमानीं संकेत दावून ॥ नृत्य करी आगळी ॥६६॥ परी नृत्य करितां भावनेंत ॥ भावना कल्पी स्वचित्तांत ॥ कीं स्मरातीते होऊनि रत ॥ कामभावनें निवटावे ॥६७॥ ऐसिये कामनीं पेटूनि कामा ॥ परी काम दाटला शरीरउगमा ॥ तेणेंकरुनि नाट्यें उत्तम ॥ नृत्य करितां चांचरली ॥६८॥ चाचणी पाहूनि अपर्णाकात ॥ तियेची भावना आणूनि चित्तांत ॥ म्हणे कामीण कामानलातें ॥ पेटली ही अप्सरा ॥६९॥ तरी अहंकार विलक्षण ॥ योग्य नव्हे ही कामीण ॥ तरी ईतें सुलभ जन्म ॥ देऊनियां रत व्हावें ॥७०॥ ऐसी कल्पना आणूनि चित्तीं ॥ बोलतां झाला पशुपती ॥ म्हणे सुरोचने काम चितीं ॥ तुझा माते समजला ॥७१॥ तरी तूं ऐसिया भ्रष्टपणीं ॥ शीघ्र पावसी मृत्यु अवनीं ॥ भद्रसंगमीं जन्म घेऊनी ॥ विप्रकुशी मिरवसी ॥७२॥ मित्राचार्य पिता तया नाम ॥ माता शरयू परम सुगम ॥ तियेचे कुशीं तुज जन्म ॥ मानवदेहीं मिरवीं कां ॥७३॥ ऐसें वदता झाला अंत ॥ सुरोचना भयभीत ॥ चित्तीं म्हणे स्वर्गच्युत ॥ हीनदैवें झालें मी ॥७४॥ अहा चित्तीं उदेले दैवमांदुस ॥ तेथें उदेला दैवें खईस ॥ तेवी इच्छिल्या शिरवतीस ॥ अलाभातें मिरवलें ॥७५॥ अहा जी करुं जातां एक ॥ प्रारब्ध घडवी अनेक ॥ करी कवळिता रत्नमाणिक ॥ काचप्रणि निवडिला ॥७६॥ ऐसी सुरोचना चित्तीं चिंतून ॥ करिती झाली म्लानवदन ॥ उपरी तिनें स्तुतिस्तवन ॥ शिवालागीं आरंभिलें ॥७७॥ म्हणे महाराजा कैलासपती ॥ नंदीवहना चक्रवर्ती ॥ त्रिशूळपाणी सर्वागी विभूती ॥ व्यक्ताव्यक्त अससी तूं ॥७८॥ फरशांकुश गदा तोमर ॥ डंमरु चक्र कपालपात्र ॥ इहीं शोभती दशकर ॥ रुंडमुंडभूषणिका ॥७९॥ भाळी इंदू कबरी गंगा ॥ श्वेतवर्णा करिती योगा ॥ वस्ती सुलक्षें आवडे नगा ॥ पूर्ण जोगा साधावया ॥८०॥ तरी हे उमामायाधवा ॥ देवा श्रेष्ठा महाभावा ॥ विज्ञानधारणीं अनुभवा ॥ महादेव तुज म्हणती ॥८१॥ तरी आतां प्रज्ञावंता ॥ चुकुर माझी वारी व्यथा ॥ भोळेपणीं मानूनि चित्ता ॥ उश्शापातें वदावें ॥८२॥ ऐसी ऐकूनि तियेची वाणी ॥ तोषला मृडानीवर मनीं ॥ म्हणे सुरोचने तूतें अवनीं ॥ प्राप्त होईल निश्चयें ॥८३॥ परी माते तूं अर्चितां ॥ प्रत्यक्ष होऊनि तुझिया अर्था ॥ मग सहज माझा स्पर्श होतां ॥ स्वस्थानातें तूं येशी ॥८४॥ हाचि माझा वरउश्शाप ॥ तरी खेदातें करीं लोप ॥ ऐसें बोलतां गणाणिवभूप ॥ चालती झाली उर्वशी ॥८५॥ भद्रसंगमीं विप्रोत्तम ॥ मित्राचार्य पवित्र नाम ॥ शरयु कांते वरितां काम ॥ दृश्य झाली जठरातें ॥८६॥ पुढें लोटतां दिवसानुदिवस ॥ पूर्ण होतां नव मास ॥ कन्यारत्नपंकजास ॥ उदय झाला वेल्हाळ ॥८७॥ परी ती ठायीची उर्वशी ॥ कवणा न वर्णवे स्वरुपासी ॥ बालार्ककिरणी सतेजराशी ॥ कनकपंकजा मिरवतसे ॥८८॥ चंद्राननी आकर्ण नयन ॥ खंजरीटकलिका देदीप्यमान ॥ जिचें पाहतां मुखमंडन ॥ मदन मूर्च्छा वरीतसे ॥८९॥ जिचे दंत माणिकवर्णी ॥ अधर विकासत सुहास्यवदनी दंततेजें पाषाणतरणी ॥ रत्नपंकजा मिरवतसे ॥९०॥ पवळदेठी अधरभार ॥ सरळ नासिक पदनस्थिर ॥ परमतेजवंत वस्त्र ॥ पाहूनि चंद्र लाजतसे ॥९१॥ चंपकमालतीसुवासमाला ॥ कीं मलयागरें दिधली कळा ॥ ऐसें गंधी षटपदमेळा ॥ रुंजावया धांवतसे ॥९२॥ एक कोश वनांत ॥ तरु होती तैं सुगंधित ॥ मृत्तिका करुनि मृगमदास ॥ सर सर परतें म्हणविती ॥९३॥ ऐसियेपरी गजगामिनी ॥ दिवसेंदिवस वृद्धि होऊनि ॥ द्वादश वरुषें पवित्रपणीं ॥ कदंबा ऐसें मिरवतसे ॥९४॥ परी ती कदंबा शुभाननी ॥ द्वादश वरुषें इंद्रियदमनीं ॥ पिता पतीतें पडतां यत्नीं ॥ परी ती न वरी भर्त्यातें ॥९५॥ सदा विरक्त शिवस्मरणी ॥ शिवध्यान आसनीं शयनीं ॥ काया वाचा अंतःकरणीं ॥ शिववेधें वेधली ॥९६॥ शिवार्चनीं तात माता ॥ जाती नित्य उभयतां ॥ तयांसगें लावण्यलता ॥ कदंबाही जातसे ॥९७॥ बाळपणीं नित्यनित्य ॥ शिवा दर्शन तियेसी होत ॥ पुढें होतां वयस्थित ॥ शिव स्वतः अर्चीतसे ॥९८॥ ऐशीं लोटतां द्वादश वरुषें ॥ तों कोणे एके सुदिन दिनास ॥ गृहीं सांडूनि तातमातेस ॥ शिवालयी गेली ते ॥९९॥ तंव ते समयीं देवळांत ॥ कोणीच नसे एकांतात ॥ कदंबा तेथे संचार करीत ॥ एकटपणी शुभांगी ॥१००॥ जय जय हर म्हणूनि वाणी ॥ मस्तक ठेवी महीलागुनी ॥ ते समयीं मृडानीवर तीलागुनी ॥ अदृश्य होता त्या ठायीं ॥१॥ गुप्त तेथ शिव पंचानन ॥ पाहता झाला तियेकारण ॥ परी ती दारा सुलक्षण ॥ मुखमंडणीं देखिली ॥२॥ जैसी चपळा तेजभरित ॥ शिवधार्मी लखलखित ॥ तीतें पाहतां अपर्णानाथ ॥ कामवेष्टणीं पडियेला ॥३॥ मग हास्ययुक्त होऊनि कुमारतात ॥ मनीं इच्छी व्हावें रत ॥ ऐसें योजूनि चपळवंत ॥ धरुं पाहे ती चपळा ॥४॥ परी तो शिव तेजखाणी ॥ धांवतां देखिला जैसा तरणी ॥ तेणेंकरुनि भयभीत होऊनि ॥ पळूं लागे कदंबा ॥५॥ शिवालयातें सोडूनि बाहेरी ॥ येती झाली विप्रकुमरी ॥ परी तो शिव कामातुर ॥ तियेमागें धांविन्नला ॥६॥ पुढें कदंबा मागें भव ॥ उभयतां महीतें घेती धांव ॥ धांव घेतां सदाशिवे ॥ जाऊनियां स्पर्शिली ॥७॥ परी शिवस्पर्श होतां तीतें ॥ सांडी मानवतनूतें ॥ सुगेचना अप्सरा होऊनि त्वरित ॥ स्वर्गाप्रती चालिली ॥८॥ चालिली परी एकीकडे ॥ शिवकामाचा उजळिला पाड ॥ ठाव सांडूनि इंद्रियपाड ॥ द्रव द्रवला महीतें ॥९॥ द्रव द्रवतां महीपाठीं ॥ पाहतां झाला कृष्णातटी ॥ उदक मिळतां एकवटीं ॥ सकळ मासे संचरले ॥११०॥ संचरले परी पूर्वीपासून ॥ तये समयीं पर्वतघन ॥ तेणें प्रवाहीं कृष्णासंगमनीं ॥ रेतपात मिरवला ॥११॥ पर्जन्यकाळी तो अचाट ॥ जात होता कृष्णपात्रांत ॥ तये संधींत राव सुभट ॥ स्नानालागीं मिरवला ॥१२॥ स्नान करुनि शशांगर ॥ तटीं बैसला होऊनि स्थिर ॥ स्नानसंध्या सारोनि समग्र ॥ अर्घ्यप्रदानीं प्रवर्तला ॥१३॥ करीं घेतां कृष्णाजीवन ॥ तों रेत दाटले अंजुळींत येऊन ॥ मानवदेहाचा स्पर्श होऊन ॥ रेतीं पुतळा रचियेला ॥१४॥ रचिला परी न लागतां क्षण ॥ सकळ अवयव दैदीप्यमान ॥ रायें पाहतां प्रत्यक्ष वदन ॥ बाळतनूतें देखिलें ॥१५॥ पाहतांचि राजा हर्षयुक्त ॥ म्हणे मज पावला उमाकांत ॥ अयोनसंभव सुत ॥ प्रतापदक्ष मज झाला ॥१६॥ तरी हा कोणी महीअवतार ॥ असेल विरिंचि हरि हर ॥ वाचस्पति सहस्त्रनेत्र ॥ अवनीवरी उतरला ॥१७॥ ऐसा आनंद मानोनि चित्तीं ॥ उठता झाला तो नृपती ॥ बाळक कवळोनि हदयाप्रती ॥ शिबिरा प्रविष्ट पैं झाला ॥१८॥ मंदाकिनी सुंदर कांता ॥ परम सत्त्वस्थ पतिव्रता ॥ तिये करीं बाळ ओपितां ॥ पाहोनि तेही आनंदें ॥१९॥ रायासी म्हणे मंदाकिनी ॥ बाळ कोणाचा आणिला स्वामी ॥ राव म्हणे अर्घ्यजीवनीं ॥ उदय पावला करपात्रीं ॥१२०॥ तरी हा ईश्वरें पुत्र तूतें ॥ दिधला आहे उमाकांतें ॥ तरी पालन करुनि महीतें ॥ पुत्रवती मिरवें कां ॥२१॥ ऐसी ऐकूनि नरेंद्र वाणी ॥ परम हर्षली मंदाकिनी ॥ मग अति स्नेहाचें भरतें आणूनी ॥ बाळ हदयीं कवळिला ॥२२॥ लावितांचि स्तन मुखासी ॥ पान्हा आला स्तनासी ॥ संस्कारोनि कृष्णागर नामासी ॥ द्वादशावे दिनीं स्थापिलें ॥२३॥ यावरी राव शिवापासून ॥ निघतां झाला मग तेथून ॥ कौंडण्यग्राम अपूर्व स्थान ॥ येऊनियां पोंचला ॥२४॥ यावरी दिवसानुदिवस ॥ कृष्णागर पावला दश वर्षे ॥ मग विवाहचिंता शशांगरास ॥ स्नुषारुपी दाटली ॥२५॥ मग कर्दयमंत्री पुरोहित ॥ ऐक्य करुनि नृपनाथ ॥ देशावरी पाठवीत ॥ सुलक्षण कुमारी योजावया ॥२६॥ परी राव सांगे मंत्रिकांकारण ॥ कीं कुमारी पहावी सुलक्षण ॥ रुपवती गुणानें समान ॥ कृष्णागरासारखी ॥२७॥ अवश्य म्हणोनि मंत्रिकवृंद ॥ जात देशातें समुच्चयवृद ॥ पुरोहितादि पाहती संबंध ॥ कृष्णागर रायाचा ॥२८॥ नाना क्षेत्र राज्य पाहूनि ॥ कुमारी पाहे मंत्री नयनीं ॥ परी कृष्णागराच्या रुप मांडणी ॥ एकही कन्या आढळेना ॥२९॥ सकळ मंत्री देशोदेश ॥ पाहूं श्रमले कुमारीस ॥ परी सर्वसंपन्न तयांस ॥ कोणी एक आढळेना ॥१३०॥ रुप पाहती तों गुण हीन ॥ गुण पाहती तों स्वरुप हीन ॥ रुप गुण असतां घटित समान ॥ उभयतांचें येईना ॥३१॥ ऐसियेपरी सांगोपांग ॥ कोठेंहि दिसेना शुभमार्ग ॥ अति श्रमोनि लागवेग ॥ स्वस्थानासी पातले ॥३२॥ रायासी भेटूनि सांगती वृत्तांत ॥ कीं कन्यारत्नें अपरिमित ॥ गुणरुपघटितार्थ ॥ कोणी एक दिसेना ॥३३॥ आजवरी महाराजा ॥ द्विसंवत्सर लोटले काजा ॥ परी कन्यारत्न चोजा ॥ नातळे ऐसें झालेंसें ॥३४॥ ऐसें रायातें मंत्री सांगून ॥ पाहते झाले आपुलीं स्थानें ॥ याउपरी षणभास दिन ॥ लोटूनि गेले तयापाशीं ॥३५॥ याउपरी कोणे एके दिवशी ॥ कृतातभृत्य येऊनी महीशीं ॥ घेऊनि गेले मंदाकिनीसी ॥ परत्रदेशाकारणे ॥३६॥ मग सुशरीर मंदाकिनी ॥ रायें शशांगरें पाहनी ॥ परम विव्हळ झाला वियोगेंकरुनी ॥ शोकार्णवीं दाटला ॥३७॥ परी कैसाही असला मायिक देही ॥ मेल्यामागें मरत नाही ॥ असो उचंबळोनि शोकप्रवाहीं ॥ हुंदकिया संपादि ॥३८॥ उपरी उत्तरक्रिया करुनि ॥ राव सेवी सिंहासन ॥ त्यासही लोटल्या संवत्सर पूर्ण ॥ श्राद्धदशा उरकली ॥३९॥ उरकली परी कामिनीविण ॥ राया चित्तीं न वाटे कल्याण ॥ कामानळीं पंचप्राण ॥ व्याकुळ बहु होतासी ॥४०॥ परी राव तो इंद्रियदमनी ॥ कदा न पाहे व्यभिचार मनीं ॥ मग मंत्रिकासी बोलावुनी ॥ निक्ट बैसवी आपुल्या ॥४१॥ म्हणे मकरंदा सुलक्षणा ॥ तूं करुं गेलासी देशभ्रमणा ॥ परी कुमारी रुपवंत आणि सगुणा ॥ कोणी तरी आढळली कां ॥४२॥ मंत्री म्हणे जी नृपनाथ ॥ कुमारी आहे स्वरुपवंत ॥ आणि गुणही उत्तम दिसत ॥ परी घटित दिसेना ॥४३॥ उपरी मंत्रिका बोलत ॥ जरी सुतालागीं न उतरे घटित ॥ तरी आमुचे नामीं घटितार्थ ॥ शोध शोधूनि पहावा ॥४४॥ मंत्री म्हणे जी पुरोहितें ॥ टिप्पणे आणिली आहेत लिखितें ॥ तरी त्यातें पाचारुनि संबंधातें ॥ विलोकूनि पाहिजे ॥४५॥ मग पाचारुनि पुरोहितास ॥ सकळ कुमारीची टिप्पणें पहात ॥ तों चित्रकुटीचा नृपनाथ ॥ घटितार्थ आवडला ॥४६॥ नाम जया भुजध्वज ॥ धार्मिक प्राज्ञिक महाराज ॥ तयाची कन्या तेजःपुंज ॥ भुजावंती मिरवली ॥४७॥ रुपवंत गुणवंत ॥ तया नामीं आले घटित ॥ मग पाचारुनि मंत्रिकातें ॥ तया स्थानीं पाठविले ॥४८॥ मंत्री जाऊनि चित्रकूटासी ॥ पुन्हां भेटूनि भुजध्वजासी ॥ वृत्तांत सांगूनि सकळ रायासी ॥ लग्नपत्रिका काढिली ॥४९॥ लग्नपत्रिका आणि भृत्य ॥ लिहूनि पाठविले अर्जदास्त ॥ रायापाशीं येतांचि दूत ॥ वर्तमान निवेदिती ॥१५०॥ लग्नपत्रिका आणि दूत ॥ पाहूनि राव संतोषत ॥ मग सरंजामीं जाऊनि तेथ ॥ लग्नसोहळा उरकला ॥५१॥मग ती कांता घेवोनि राव ॥ पाहता झाला आपुला ठाव ॥ उपरी दिवसेंदिवस थोरीव ॥ भुजावंती झालीसे ॥५२॥ त्रयोदश वर्षे व्यवस्थित ॥ भुजावंती मही मिरवत ॥ येरीकडे सप्तदश वर्षात ॥ कृष्णागरु मिरवला ॥५३॥ परी भुजावंती अंतःपुरांत ॥ धाम उभविलें एकांत ॥ अगम्य जितुके रायातें ॥ तितुके ती मिरवत ॥५४॥ असो एकांती भुजावंती ॥ सापत्नसुताची ऐकीव उक्ती ॥ होती परी दृष्टिव्यक्ती ॥ एकमेकांतें पाहती तीं ॥५५॥ तो कोणे एके सुदिनाशीं ॥ राव गेला मृगयेसी ॥ कृष्णागरु धामासीं ॥ वेधोनियां पहातसे ॥५६॥ सहज वावडी घेवोनि हातीं ॥ चित्त रंजवी खेळा निगुतीं ॥ तो येरीकडे भुजावंती ॥ धामावरी आलीसे ॥५७॥ राजकिशोर पाहूनि नयनीं ॥ दृष्टी वंचली सुतालागूनी ॥ तेणें वेष्टूनि पंचबाणी ॥ परिचारिके बोलत ॥५८॥ म्हणे पैल धामाप्रती ॥ वावडी उडवी वाताकृती ॥ त्यातें पाचारुनि उत्तमगती ॥ स्वधामातें आण वेगें ॥५९॥ ऐसें ऐकूनि दासी वचन ॥ पाहती झाली रजनंदन ॥ रायासी म्हणे तव मातेनें ॥ चित्तीं हेतू वरियेला ॥१६०॥ तरी महाराजा उत्तम जेठी ॥ शीघ्र चलावें तियेचे भेटी ॥ राव ऐकोनि कर्णपुटीं ॥ अवश्य म्हणे येतो कीं ॥६१॥ भवंडीदोर देत सेवकाहातीं ॥ आपण निघे सर्वज्ञमूर्ती ॥ सहज चाले सदनाप्रती ॥ जात आनंदेंकरोनियां ॥६२॥ रायें करुनि आणिले लग्न ॥ तेव्हां गेला होता दर्शना ॥ तयासी लोटले बहुत दिन ॥ म्हणे आजि सुदिन उगवला ॥६३॥ मज आज वत्सातें माउली ॥ कोणीकडूनि पान्हावली ॥ तरी आज भाग्य साउली ॥ सफळ पूर्ण झालीसे ॥६४॥ ऐसा आनंदोत्साह चित्तीं ॥ मानूनि जातसे नृपती ॥ सहज चालीं सदनाप्रती ॥ जावोनियां पोंचला ॥६५॥ तंव ती दारा उपरीवरी ॥ येतां पाहिलें कृष्णागरीं ॥ खालीं उतरुनि शयनगुहारीं ॥ पाहती झाली वेल्हाळी ॥६६॥ शयनसदनाचे धरुनि द्वार ॥ उभी राहिली ती सुकुमार ॥ तों परिचारिका कृष्णागार ॥ घेऊनियां पोचली ॥६७॥ पोंचली परी हस्तसंकेतें ॥ रायाप्रती दावी सदनातें ॥ आपुल्या घरीं दासी जात ॥ भेट करुनि उभयतां ॥६८॥ येरीकडे कृष्णागर ॥ चालीं चालतां गेला समोर ॥ जातांचि करी नमस्कार ॥ सापत्न माता म्हणोनि ॥६९॥ परी ती बाळा मदनबाळी ॥ वेष्टिली होती कामानळीं ॥ तेणें चित्तदरीं काजळी ॥ अज्ञानपणीं मिरवितसे ॥१७०॥ सुतें केला नमस्कार ॥ परी ती न वदे यावर ॥ तें पाहुनियां कृष्णागर ॥ मनामाजी चाकाटला ॥७१॥ परी निकट झालिया त्या वास ॥ येरी जाऊनि धरी हस्तास ॥ म्हणे माझे तुष्ट मानस ॥ कामानळें विझवीं कां ॥७२॥ राया तव स्वरुप अर्ककांत ॥ द्रवते झालें कामानळांत ॥ तरी चितेविण जाळूं पहात ॥ शांत करीं महाराजा ॥७३॥ ऐसें ऐकतां तियेचें वचन ॥ राव कोपे क्रोधेंकरुन ॥ म्हणे सेवूनि राहसी कानन ॥ सावजापरी काय वो ॥७४॥ तूं प्रत्यक्ष माझी सापत्न माता ॥ कुडी बुद्धी वरिसी चित्ता ॥ तरी या कृत्या कोण त्राता ॥ तूतें होईल पुढारा ॥७५॥ अहा स्त्रीजाती अमंगळा ॥ दुर्गमसरिता परम चांडाळा ॥ नेणें अनर्थासह बंडाळा ॥ जगामाजी वाढविती ॥७६॥ ऐसें म्हणूनि कृष्णागर ॥ आसडूनि चालिला आपुला पदर ॥ सदना येऊनि खेळावर ॥ तैसाचि पुन्हां वहिवाटला ॥७७॥ येरीकडे भुजावंती ॥ सुत ऐसे समजतां चित्तीं ॥ परम भयाचे व्याप्ती ॥ दासीलागीं पाचारी ॥ म्हणे बाई वो झालें विघ्न ॥ प्रेम भयानक घेईल प्राण ॥ तो परपुरुष नव्हता सापत्ननंदन ॥ अर्थ ओंगळ झाला गे ॥७९॥ तरी हा झाला वृत्तांत ॥ आतां रायास करील श्रुत ॥ श्रुत झालिया प्राणघात ॥ मिरवेल सखे मम देहीं ॥१८०॥ तरी आतां विष घेऊन ॥ द्यावा वाटते आपुला प्राण ॥ प्राण हरल्या सकळ कल्याण ॥ मजप्रती वाटतसे ॥८१॥ विपरीतात विपरीत करणी ॥ गुप्त राहील सकळ जनीं ॥ नातरी वांचल्या विटंबनी ॥ नाना क्लेशां भोगावे ॥८२॥ तरी यांतचि सारगोष्टी ॥ हेत मिरवावे मृत्युवाटीं ॥ नातरी वांचल्या राव शेवटीं ॥ विटंबोनि मारील गे ॥८३॥ मारिल्यास सर्व लोकांत ॥ बाई गे होईल अपकीर्त ॥ म्हणतील रांड परम कुजात ॥ भ्रष्टबुद्धि पापिणी ॥८४॥ असो ऐसा दुर्घट विचार ॥ ओढवला तरी सारांत सार ॥ गुप्तप्रकरणीं प्राणावर ॥ उदार व्हावें आपणचि ॥८५॥ ऐसी तीतें बोलतां युवती ॥ सखी होईल उत्तराप्रती ॥ तें पुढील अध्यायीं भक्तिसारग्रंथीं ॥ श्रवण करा श्रोते हो ॥८६॥ तरी हा ग्रंथ भक्तिसार ॥ तुम्हींच वदवितां मनोहर ॥ निमित्त मात्र धुंडीकुमर ॥ मालू नरहरीचा मिरवितसे ॥८७॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ त्रिंशति अध्याय गोड हा ॥१८८॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥३०॥ ओंव्या ॥१८८॥ ॥ नवनाथभक्तिसार त्रिंशति अध्याय समाप्त ॥

If You Like This Article, Then Please Share It