Navnath Bhaktisar Adhyay 29

Navnath Bhaktisar Adhyay 29 is the twenty-ninth chapter of the book. Reading it is beneficial to cure tuberculosis and fevers.

Navnath Bhaktisar Adhyay 29:

श्रीगणेशाय नमः ॥ रुक्मिणीवरा कमलाकांता ॥ चाणूरमर्दना वसुदेवसुता ॥ कंसारी तूं जगत्राता ॥ वासुदेवा जगदीशा ॥१॥ शेषशायी हलधरभ्राता ॥ भावप्रिया सुदर्शनदर्शिता ॥ द्रौपदीलज्जारक्षणकर्ता ॥ पाठिराखा मिरवसी ॥२॥ जैसा पांडवांचा पाठिराखा ॥ तैसा मिरवसी मम दोंदिका ॥ भक्तिसारग्रंथ कौतुका ॥ वाग्वरदा म्हणविसी ॥३॥ मागिले अध्यायीं विरहस्थिती ॥ लाधली गाढत्वें भर्तरीप्रती ॥ पिंगलेकरितां स्मशानक्षिती ॥ पूर्ण तप आचरला ॥४॥ तया क्लेशाचे उद्देशीं ॥ मित्रावरुणी दत्तापाशीं ॥ श्रुत करुनि स्वस्थानासी ॥ येऊनियां पोहोंचला ॥५॥ इतुकी कथा सिंहावलोकनीं ॥ चित्तीं धरावी श्रोतेजनीं ॥ यापरी पुढें ग्रंथमांडणीं ॥ सिद्ध अवधानी असावें ॥६॥ असो गर्भाद्रींत मच्छिंद्रनाथ ॥ ठेवूनि गोरक्ष करावया तीर्थ ॥ महीलागीं भ्रमत ॥ गिरनारप्रती पातला ॥७॥ तेथें भेटोनि दत्तात्रेयासी ॥ भावें नमिलें प्रेमराशीं ॥ श्रीदत्तें धरोनि हदयासी ॥ आनंदानें उचंबळला ॥८॥ श्रीकरपद्में मुखमंडन ॥ गोरक्षाचें कुरवाळूनि वदन ॥ निकट बैसविला हस्त धरोन ॥ अलाई बलाई घेतसे ॥९॥ मोहितवाणीं पुसतसे त्यातें ॥ म्हणे कोठें रे मच्छिंद्रनाथ ॥ तूं सोडूनि निरपेक्ष त्यातें ॥ महीलागीं भ्रमतोसी ॥१०॥ येरुं सांगे पुन्हां नमोन ॥ गर्भाद्रिपर्वती मच्छिंद्रनंदन ॥ राहिलासे स्वसुखेंकरुन ॥ जपजाप्यातें योजूनियां ॥११॥ मुहूर्तपणे स्वसुखासीं ॥ लाविलें असें तीर्थस्नानासी ॥ मग मी नानातीर्थउद्देशीं ॥ करीत आलों परियेसा ॥१२॥ ऐसा वदोनि वृत्तांत ॥ याउपरी बोले अत्रिसुत ॥ वत्सा कार्य लागलें मातें ॥ त्या कार्यातें संपादीं ॥१३॥ तरी म्हणसी कार्य कवण ॥ भर्तरी मम अनुग्रही नंदन ॥ तो स्वकांतेकरितां स्मशान ॥ द्वादश संवत्सर सेवीतसे ॥१४॥ अन्नोदकाचा त्याग करुन ॥ सेवोनि आहे तृणपर्ण ॥ कांता कांता चिंतन करुन ॥ द्वादश वर्षे बैसला ॥१५॥ तरी तुवां जावोनि तेथें ॥ सावध करीं युक्तिप्रयुक्ति ॥ सकळ दावीं अशाश्वत ॥ आपुले पंथीं मिरवावें ॥१६॥ त्यासी मीं अनुग्रह जेव्हां दिधला ॥ तेव्हांचि गुंतविला संकल्पाला ॥ कीं सोडूनि वैभवपंथाला ॥ नाथपंथीं मिरवेन मी ॥१७॥ तरी तया बोलासी जाण ॥ दिवस लोटूनि गेले पूर्ण ॥ मग जन्मापासूनि सकळ कथन ॥ भर्तरीच्या सांगीतलें ॥१८॥ समुचयगोष्ट ऐकूनि कथन ॥ मान तुकावी गोरक्षनंदन ॥ म्हणे महाराजा तव कृपेने ॥ कार्य सत्य करीन हें ॥१९॥ तव आज्ञा यापरी मातें असतां ॥ मग भर्तरी लोहातें आणीन कनकता ॥ ही अशक्य नसे मातें वार्ता ॥ अर्थ घडला सहजचि ॥२०॥ हें महाराजा तूं कृपाघन ॥ वर्षलासी मम देहकारण ॥ तैं भर्तरीतरुनें ज्ञानकण ॥ अनायासें कणसेंचि ॥२१॥ तव कृपा जवळी असतां ॥ मग भर्तरीक्षुधेची कामवार्ता ॥ ही अशक्य नसे मातें करितां ॥ तृप्त सिद्धीतें भिनवाया ॥२२॥ कीं तव कामकल्पतरु ॥ मम चित्तागणीं पावला विस्तारु ॥ तेथें भर्तरीहीनत्वविचारु ॥ दरिद्रातें उरेना ॥२३॥ तरी आतां बोलतों प्रमाण ॥ कार्य आपुलें करुनि देईन ॥ ऐसें म्हणोनि वंदोनि चरण ॥ शीघ्रगती निघाला ॥२४॥ व्यानअस्त्र जपोनि होटीं ॥ भाळी चर्चिली भस्मचिमुटी ॥ मग व्यानमंत्रे महीपाठी ॥ गमन करुं निघाला ॥२५॥ लवतां डोळ्याचें पातें ॥ क्षणें आला अवंतिकेप्रत ॥ पन्नास योजनें निमिषांत क्षितींत ॥ लंघोनिया पातला ॥२६॥ तों गोरक्ष येतां स्मशाननिकट ॥ दुरोनि पाहे भर्तरी नेट ॥ तों सर्वांग दिसे अटि कृशवट ॥ अस्थिगत प्राण देखिला ॥२७॥ मुखीं तितुकीच सहजध्वनी ॥ म्हणे राम हे बरवी केली करनी ॥ आम्हां उभयतांची तुटी करोनी ॥ पिंगला नेली जवळिके ॥२८॥ ऐसी सहजध्वनि ऐकोन ॥ पाहूनि तयाचें कृशपण ॥ परम चित्तीं हळहळोन ॥ चकचकाव मानीतसे ॥२९॥ चित्तीं म्हणे अहा कठिण ॥ राव आचरे परम निर्वाण ॥ अस्थिमय राहिला प्राण ॥ त्वचा व्यक्त होऊनियां ॥३०॥ तरी ऐसा विरह जयासी ॥ बाणलाहे पूर्ण मानसीं ॥ तो वरपंगी वाग्वरासी ॥ कदाकाळीं मानीना ॥३१॥ तरी यातें आम्ही जें बोलूं ॥ तें तें सकळ होय फोलू ॥ जैसा क्षुधेला वेळू ॥ पळवा तेथें मिरवेना ॥३२॥ जैसा खापरासी परीस भेटे ॥ व्यर्थ होय यत्नपाठ ॥ तेवीं बोधितां बोध अचाट ॥ व्यर्थपणीं मिरवेल ॥३३॥ कीं हिंगतरु अपार विपिनीं ॥ त्यांत मैलागरु स्थापिला वनीं ॥ तया सुगंध लिप्तदुर्गध वनीं ॥ कदाकाळी तुटेना ॥३४॥ कीं शर्करेचे आळीपाळीं ॥ शक्रावणाच्या वेष्टिल्या वेली ॥ परी त्या कटुत्वपणा सकळां ॥ मधुरपणा मिरवेना ॥३५॥ कीं चतुराननाचे हस्तकमळीं ॥ जन्मभर स्थापिलें दरिद्र भाळीं ॥ तैं व्यवसायेंकरुनि नव्हाळी ॥ कदाकाळीं चालेना ॥३६॥ तरी आतां विचार येतां ॥ योजावा कांही बोधरहिता ॥ ज्यातें जैसी कामना स्थित ॥ तैसी स्थिती वर्तावी ॥३७॥ कीं श्वपुच्छा चक्रवेढा ॥ नीट होण्या यत्न पाडा ॥ तेवीं राव झाला वेडा ॥ शब्दबोध चालेना ॥३८॥ जैसा जो तैसाचि होतां स्थित ॥ मग संतोष मिरवे चित्त ॥ संतोष मिरवल्या कार्य प्राप्त ॥ घडोनि येतें सकळिकां ॥३९॥ पहा राम शत्रु दानवां ॥ परी विभीपण मिरवला भिन्नभावा ॥ तेणेंकरुनि स्ववैभवा ॥ भंगूं दिलें नाहींच कीं ॥४०॥ कीं बळियारायाचें जिणें ॥ त्यासी मिरवला तो वामन ॥ मातृशत्रू फरशधर होऊन ॥ तातासमान वहिवटला ॥४१॥ तन्न्यायें करुनि येथें ॥ रायासी ओपावें सर्व हित ॥ संतोष मिरवोनि अत्रिसुता ॥ कीर्तिध्वज लावावा ॥४२॥ मग जाऊनि अवंतिकेंत ॥ कुल्लाळगृहीं संचार करीत ॥ एक गाडगें आणूनि त्यातें ॥ बाटली नाम ठेविलें ॥४३॥ उपरी रंग चित्रविचित्र ॥ देऊनि रोगणीं केलें पवित्र ॥ मग तें चमकपणीं पात्र ॥ तेजालागीं दर्शवी ॥४४॥ परो अंतरीं पात्र कच्चेपणीं ॥ वरी रंग दावी लखलखोनी ॥ जेवीं वाढीव ब्रह्मज्ञानी ॥ परी अंतरी हिगो ॥४५॥ बोलतां ज्ञानी विशेष ॥ कीं प्रत्यक्ष मिळाला स्वरुपास ॥ ऐसें भासलें तरी ओंफस ॥ तरी अंतरी हिंगो ॥४६॥ नव तें मडकें कच्चेपणीं ॥ वरी सुढाळ दिसे रंग सन्मुख तत्त्वतां ॥ ठेंचेचे निमित्त करुनि नाथ ॥ भूमीलागी पडतसे ॥४८॥ अंग धरणीं देत टाकून ॥ सोंग दावी मूर्च्छापणें ॥ त्या संधींत बाटली कवळून ॥ बाटलीलागीं न्याहाळी ॥४९॥ असो बाटली गेली फुटोन ॥ मग सोंग मूर्च्छेचें सांवरोन ॥ भंवतें पाहे विलोकून ॥ बाटली झाली शतचूर्ण ॥५०॥ तंव ती देखिली शतचूर्ण ॥ मग उठतां झाला अहा म्हणोन ॥ म्हणे माझी माय बहीण ॥ वाटले कैसी फुटलीस तूं ॥५१॥ सकळ मेळवूनि तिचे खापर ॥ शोक करीतसे वारंवार ॥ ऊर्ध्वशब्दें गहिंवर ॥ लोकांमाजी दाखवी ॥५२॥ म्हणे अहा माझी बाटली ॥ दैवें कैसी फुटोनि गेली ॥ आतां ती माझी परम माउली ॥ कोणे रानी धुंडाळूं ॥५३॥ अहा माय गेलीस सोडोन ॥ आतां तुजसाठीं वेंचीन प्राण ॥ अहा विधात्या कैसें घडोन ॥ आणिलें तुवां या ठायी ॥५४॥ अहा माजे माय बहिणी ॥ कैसी गेलीस सोडोनी ॥ दाही दिशा मजलागोनी ॥ ओस करोनि गेलीस ॥५५॥ माये गे माय गा ठायीं ॥ तूं वांचली असतीस आपुले देहीं ॥ मी पावलों असतों मृत्युप्रवाहीं ॥ त्यांत कल्याण मानितो ॥५६॥ ऐसे शब्द रायें ऐकोन ॥ हास्य करी गदगदोन ॥ चित्तीं म्हणे पावलिला मरण ॥ मडक्याम काय मग करितां ॥५७॥ ऐसी अदेशा आणोनि चित्तीं ॥ हास्य वारंवार करी नृपती ॥ येरीकडे गोरक्ष क्षितीं ॥ आरंबळे अट्टाहास्यें ॥५८॥ धरणीं टाकोनि शरीर ॥ हदय पिटीं उभय करीं ॥ अहा बाटली वागुत्तरी ॥ ऐसें म्हणोनि आरंबळे ॥५९॥ म्हणे तूं गेलीस माय बहिणीं ॥ परी माझें आटलें सुदैवपाणी ॥ अहा माझा वासरमणी ॥ अस्ताचळा गेलासे ॥६०॥ अहा बाटली माझें घन ॥ कोणें दुर्जनें नेलें हिरावोन ॥ अहा बाटले तुझें वदन ॥ एकदां दावीं मजलागीं ॥६१॥ अहा बाटली परम धूर्जटी ॥ कोणी हिरावली मम अंधाची काठी ॥ ऐसें म्हणोनि वाग्वटी ॥ माय वदन दावीं गे ॥६२॥ ऐसें म्हणोनि दीर्घरुदन ॥ करीत आहे अट्टाहास्येंकरोन ॥ परी राव भर्तरी तें पाहुन ॥ चित्तामाजी चाकाटे ॥६३॥ अहा पिंगला हा पिंगला ॥ ऐसा घोप करीत बैसला ॥ परी तें पाहूनि विसरला ॥ मनीं आश्चर्य बहु मानी ॥६४॥ म्हणे वोंचिता दमडी अडका ॥ तयासाठीं धरुनि आवांका ॥ नाशवंत जाणे सर्व निका ॥ शोक केवीं करतसे ॥६५॥ ऐसें जल्पूनि चित्तीं ॥ निवांत बैसला तये क्षितीं ॥ परी हुडहुडी तरुफलाप्रती ॥ शांतपणें राहीना ॥६६॥ सुशब्दवाक्या अमृतपर ॥ सिंचिता झाला वागुत्तर ॥ म्हणे योगिया कां चिंतातुर ॥ शोक करिसी हें सांग ॥६७॥ अरे वेंचितां सापिका कवडी ॥ मडकें येईल पुन्हां आवडीं ॥ तयासाठीं शोकपरवडी ॥ करिसी काय हे मूर्खा ॥६८॥ ऐसें उत्तरद्रुमाचें फळ ॥ अर्थी ओपितां नृपाळ ॥ यावरी गोरक्षबाळ ॥ बोलता झाला तयातें ॥६९॥ म्हणे महाराजा नृपाळा ॥ तूं शोक करिसी कवण मेळा ॥ तरी दुःखाब्धिशोकजाळा ॥ प्रचीति पाहें आपुली ॥७०॥ तरी अहा पांथस्थ तूं प्रकाम ॥ कंठीं लागला जगाचा उगम ॥ तरी त्या उभवोनि अनर्थघाम ॥ सुख कैसें नांदेल ॥७१॥ तरी आपणावरुनि नृपती ॥ घ्यावी जगाची अर्थप्रचीती ॥ माझी बाटली फुटल्या क्षितीं ॥ दुःख जाणें मी एक ॥७२॥ राव ऐकूनि वागुत्तरा ॥ पुन्हां म्हणतसे ऐकिजे नरा ॥ मम दुःखाचा दृष्टांत खरा ॥ प्रचीतिरुपीं धरिला त्वां ॥७३॥ परी माझी पिंगला राणी ॥ मान पावली जेवीं सौदामिनी ॥ हारपली जैसी सौदामिनी ॥ परतोनि कैसी प्राप्त होय ॥७४॥ शतानुशत मडकीं मिळत ॥ प्राप्त करुनि देईन क्षणांत ॥ पिंगलेसमान स्त्रीरत्न ॥ कैंचे दुसरे मिळेल ॥७५॥ यावरी गोरक्ष बोले वचन ॥ तुझ्या पिंगला लक्षवधि जाण ॥ प्राप्त करीन एक क्षण ॥ परी ऐसी बाटली मिळेना ॥७६॥ ऐसें ऐकूनि नराधिप ॥ म्हणे पिंगलेचें स्वरुप ॥ गुणवती गंभीर दीप ॥ लक्षावधि दाविसी ॥७७॥ तरी लक्षावधि पिंगला मातें ॥ आतांचि दाखवीं सदगुरुभरिते ॥ तूतें बाटल्या शतानुशतें ॥ सिद्ध करितों या ठाया ॥७८॥ तरी तुझा चमत्कारु ॥ दावीं मातें कल्पतरु ॥ जैसा भूषण कृपापरु ॥ गुरुसुत तो गहिंवरला ॥७९॥ तरी बा समान करणी ॥ मातें मिरवेल अंतःकरणीं ॥ नातरी ढिसाळ बाटल्यावाणी ॥ परी अर्थ हिंगूच दिसतसे ॥८०॥ जैसें मृगजळाचें पाणी ॥ परी अब्धिसमान वाटे खाणी ॥ परी तृषाकोडाचा वासरमणी ॥ अतस्ताचळीं पावेना ॥८१॥ कीं शुद्ध ओडंबरी घन ॥ स्वगींहूनि करी गर्जन ॥ परी तोय लेशमान ॥ महीलागीं आतळेना ॥८२॥ कीं काजवा जो तो दिढवा दावी ॥ तरी कां तिमिरास तो आटवी ॥ तेवीं बोल फोलप्रवाहीं ॥ मिरवू नको योगेंद्रा ॥८३॥ ऐसें ऐकतां वचन ॥ म्हणे राया नरेंद्रोत्तमा ॥ पिंगलाउदय लक्षावधीन ॥ केलिया मज देसील काय ॥८४॥ येरु म्हणे पिंगला नयना ॥ दाविलिया पुरवीन इच्छिली कामना ॥ राज्यवैभव सुखसेवना ॥ संकल्पीन तुजलागीं ॥८५॥ ऐसें बोलतां नरेंद्रपाळ ॥ साक्ष कोण म्हणे गोरक्षबाळ ॥ येरु म्हणे पंचमंडळ ॥ साक्षभूत असती बा ॥८६॥ आणि अनलादि स्वर्गसविता ॥ जळपाताळ जळमही मान्यता ॥ हे साक्ष असती बा देस्वता ॥ पशु पक्षी मृगादिक ॥८७॥ जरी मज न घडे बोलासमान ॥ तरी पूर्वज सर्व पावती हीन ॥ स्वर्गवासी पावती पतन ॥ नरकवास भोगिती ॥८८॥ आणि शतजन्म रौरवकार ॥ महीं भोगीन वारंवार ॥ जरी मी न ओपीं राज्यसंभार ॥ तुजलागीं महाराजा ॥८९॥ ऐसें बोलूनि शपथपूर्वक ॥ पुन्हां बोले शपथदायक ॥ म्हणे महाराजा हे तपपाळक ॥ बोलासमान दावीं कीं ॥९०॥ जरी या बोलासमान राहणी ॥ तूं न दाखविसी मातें नयनीं ॥ तरी नरक पावसील सहस्त्र जन्मीं ॥ विहित वाचे अनृतत्वें ॥९१॥ ऐसी राजेंद्र बोले वाणी ॥ सत्यार्थ म्हणतसे योगतरणी ॥ मग कामिनीअस्त्र पिंगलानामीं ॥ प्रयोगातें उच्चारी ॥९२॥ मग सहज करुनि ऊर्ध्व दृष्टी ॥ फेंकिता झाला भस्मचिमुटी ॥ तंव ते कामिनी अस्त्रपोटीं ॥ स्त्रिया कोटी उतरल्या ॥९३॥ मुख्य पिंगला जी भस्म झाली ॥ तीच अनंत मूर्ति धरुनि उतरली ॥ पाठीं पोटीं व्यापिली ॥ सन्मुख उभी राहिली रायाच्या ॥९४॥ राव पाहूनि पिंगलास्वरुप ॥ मोह कामाचा उजळला दीप ॥ सकळांसी बैसवोनि आपणासमीप ॥ संसारखुणा पुसतसे ॥९५॥ परी त्या पिंगला सगुणसरिता ॥ सर्व सांगती अचूक वार्ता ॥ सांगूनि उपरी बोधअर्था ॥ रायाप्रती बोलती ॥९६॥ म्हणती महाराजा प्राणेश्वरा ॥ मम विरहाचें शल्य बैसलें अंतरा ॥ परी अशाश्वताचा माथां भारा ॥ फुकटपणीं वाहिला ॥९७॥ म्यां चित्तीं करुनि तुमची प्रीती ॥ दाहूनि घेतले देहाप्रती ॥ पुन्हां उदय गोरक्षजती ॥ अनंत दृश्य पैं केलें ॥९८॥ केलें तरी तुम्हांभावनी ॥ मिरवणें मज पुन्हां अवनीं ॥ परी शेवटी मृत्युपणाची काचणी ॥ तुम्हां आम्हां असेचि ॥९९॥ तरी राया महीभोजा ॥ आतां संग सोडूनि माझा ॥ मोक्षमहींतळीं ध्वजा ॥ लावोनियां उभारी ॥१००॥ यापरी माझा काम चित्तीं ॥ वरुनि आचरला संसारनीति ॥ परी मुक्तिमोक्षाची मांदुस हातीं ॥ चढणार नाहीं महाराजा ॥१॥ मी पिंगला तुमची कांता ॥ आचार आचारलें पतिव्रता ॥ तेणें डौरवोनि श्रीवरें माथा ॥ दिधलें हिता मजलागीं ॥२॥ आतां तुमचे सर्व हित ॥ तुम्ही विलोका प्रज्ञावंत ॥ मी तुमची दासी तुम्हां संमत ॥ चालूं शकें महाराजा ॥३॥ ऐसे वदोनी निवांतपणीं ॥ पिंगला बैसली राव वेष्टोनि ॥ परी तो चमत्कार पाहोनि ॥ विस्मय त्यासी वाटला ॥४॥ मग धांवूनि गोरक्षचरणीं ॥ लोटूं पाहे दंडवत अवनीं ॥ परी सर्वज्ञ गोरक्ष धरुनि पाणी ॥ रायाप्रती बोलतसे ॥५॥ हे महाराज महीपाळ ॥ माझा गुरु जो मच्छिंद्रबाळ ॥ मच्छिंद्रनामें प्रतापशीळ ॥ शिष्य आहे दत्ताचा ॥६॥ तरी यापूर्वी तुझिया देहीं ॥ दत्तानुग्रह लाधला पाहीं ॥ तरी तूं मच्छिंद्रसहोदर महीं ॥ गुरु माझा अससी कीं ॥७॥ तरी तूं वंद्य आहेसी मातें ॥ म्हणोनि नमना अनुचित ॥ तरी माझा साष्टांग प्रणिपात ॥ तव चरणी असो कीं ॥८॥ तरी राया सदगुरुभ्राता ॥ सांग कीं कामना केवीं उदभवली चित्ता ॥ राज्यवैभव संसारदुहिता ॥ पिंगला भोगूं इच्छीतसे ॥९॥ किंवा सोडूनि सकळ संपत्ती ॥ कामनाविरह वैराग्य चित्तीं ॥ आचरुं ऐसी बोधमती ॥ तरी स्थिती सांग कीं ॥११०॥ जैसी कामना असे चित्ता ॥ तैसीच लाभेल तेजभरिता ॥ ऐसें बोलतां गोरक्षनाथा ॥ राव बोले उत्तर ॥११॥ म्हणे महाराजा द्वादश वरुनां ॥ बैसली पिंगलाउद्देशा ॥ परी पिंगला स्वरुपास ॥ प्राप्त झाली नाहीं कीं ॥१२॥ तरी येऊनि त्वरितात्वरित ॥ पिंगला दाविल्या शतानुशत ॥ तरी ऐसें सबळ सामर्थ्य ॥ राज्यपदीं दिसेना ॥१३॥ मी पूर्वीच भ्रांतीं वेष्टिलों ॥ श्रीगुरुचे हातापासूनि निसटलों ॥ निसटलों परी कष्टलों ॥ संसारतापामाझारीं ॥१४॥ तरी आतां कृपाघन ॥ दत्तदर्शनाचें अपार जीवन ॥ मज चातका करीं पान ॥ कृपाघना महाराजा ॥१५॥ आतां मातें संसारराहणी ॥ राज्यवैभव सुखावणीं ॥ तुच्छ लागे योगधर्मी ॥ प्रतापानें हीन तैं ॥१६॥ धन्य तूं एक प्रत्ययास ॥ पिंगला दाविली चमत्कारास ॥ जेवीं आवडी कुरुपाळास ॥ कौरवदर्शना दाविलें ॥१७॥ तैसें पूर्ण कथेंत ॥ दर्शन करविलें मातें येथ ॥ तरी मी न राहें भवभ्रांतींत ॥ वेष्टोनियां महाराजा ॥१८॥ आतां आचरेन पूर्ण योगा ॥ साधीन सकल कलांसी प्रयोगा ॥ माझा स्वामी अनसूयाकुशिगा ॥ रत्न मातें दावीं कां ॥१९॥ गोरक्ष म्हणे विरहे नृपाळा ॥ मनीं वरिली आहे पिंगला ॥ तरी लक्षावधी प्राप्त या वेळा ॥ तूतें झाल्या महाराजा ॥१२०॥ तरी तितुक्या भोगूनि आतां ॥ संतुष्ट करीं आपुल्या चित्ता ॥ येरु म्हणे एकीकरितां ॥ दुःख इतुकें भोगिलें ॥२१॥ मम लक्षावधी भोगून ॥ तयांचे दुःख अवर्णन ॥ कोणी भोगावें चंद्रार्कमान ॥ अवधीतें सांडोनियां ॥२२॥ एक वृश्चिक दंशिल्या अंगा ॥ वेदना होती भोगा ॥ त्यांत लक्षानुलक्ष सुयोगा ॥ दंशिल्या काय सांगावें ॥२३॥ तरी आतां असो कैसें ॥ पुन्हा अदृश्य करीं पिंगलेस ॥ आणि तूं राज्यवैभवास ॥ सांभाळ करीं महाराजा ॥२४॥ तरी माझिया स्वामीचे चरण ॥ आतां दावीं मजकारण ॥ इतुका उपकार करुन ॥ कीर्तिध्वजा मिरवीं कां ॥२५॥ मग अवश्य म्हणे गोरक्षसुत ॥ पुन्हां अदृश्य पिंगला समस्त ॥ मग धरोनि भर्तरीनाथाचा हस्त ॥ नगरामाजी आणिला ॥२६॥ आणिला तेव्हां हर्ष समस्तां ॥ लोटिती झाली आनंदसरिता ॥ विक्रमरायानें माथा ॥ गोरक्षचरणीं ठेविला ॥२७॥ रायें बैसवोनी कनकासनीं ॥ षोडशोपचारे पूजिला मुनी ॥ मग जोडोनियां पाणी ॥ गोरक्षकातें पुसतसे ॥२८॥ म्हने महाराजा मम भ्राता ॥ पिंगलाविरहें पेटल्या चित्ता ॥ कैसा आणिला देहावरता ॥ तरी कथा सांगावी ॥२९॥ मग रायातें सकळ कथन ॥ तुष्ट केला मनोधर्म ॥ उपरी वैराग्यसंकेत पावून ॥ पुढील कार्य सांगितलें ॥१३०॥ परी विक्रम तो सर्व मर्मज्ञ ॥ तुष्टतांचि मिरवी मनोधर्म ॥ यावरी बोलता झाला वचन ॥ गोरक्षकांतें तेधवां ॥३१॥ हे महाराजा कृपामूर्ती ॥ आपण बरीच योजिली युक्ती ॥ परी आपण येथ षण्मास वस्ती ॥ भ्रात्यासमवेत करावी ॥३२॥ म्हणाल तरी काय कारण ॥ तरी द्वादश वर्षे सोडिले अन्न ॥ तेणें कृश शरीर होऊन ॥ प्राण डोळां उरलासे ॥३३॥ म्हणोनि आपणा विनंतिपत्र ॥ पुढें वाढितों पवित्र ॥ तरी तें स्वाद्वन्न सेवोनि चित्र ॥ मम मानसा पोसावें ॥३४॥ यावरी बोले गोरक्ष जती ॥ जाणत आहे माझे चित्तीं ॥ परी नेणों यावरी पुढें मती ॥ कैसी होईल रायाची ॥३५॥ त्याकरितां तप्तातप्त ॥ देईन रायाचें हातीं हित ॥ आतां राहणें योग्य मातें ॥ दिसत नाहीं महाराजा ॥३६॥ ऐसें विक्रमा गोरक्ष बोलोन ॥ प्रविष्ट झालें सकळांकारण ॥ द्वादशशत राण्या आदिकरोन ॥ वृत्तांत त्यांतें समजला ॥३७॥ मग तें असुख मानूनि चित्तीं ॥ शोकें युवती विव्हळ होती ॥ गोरक्षातें शिव्या देती ॥ मेला मेला म्हणोनियां ॥३८॥ नाना वल्गना बोलती ऐसी ॥ म्हणती होता दृष्टीसरसीं ॥ मेल्यानें येऊनि घातलें फांशीं ॥ दूरदेशा न्यावया ॥३९॥ तरी याचे जळो वदन ॥ नेतों आमुचें सौभाग्यरत्न ॥ ऐसें म्हणोनि म्लान वदन ॥ रुदनाते दाविती ॥१४०॥ असो यापरी विक्रपाकरितां ॥ त्रिरात्र झाला राहता ॥ मग भर्तरी गोरक्ष उभयतां ॥ निघते झाले तेथोनी ॥४१॥ राव विक्रमा आनंद चित्तीं ॥ उभयतांचे घेऊनि संगतीं ॥ बोळवीतसे अति प्रीतीं ॥ गोरक्षातें वंदूनिया ॥४२॥ परी स्त्रियांचे कटकांत ॥ थोर ओढवला आकांत ॥ शरीर टाकूनि भूमोवरतें ॥ आरंबळती अट्टाहास्यें ॥४३॥ आठवोनि रायाचे निपुण गुण ॥ स्त्रिया करिती अट्टहास्यें रुदन ॥ म्हणती आमुचा गेला प्राण ॥ रावशरीरी मिरवला ॥४४॥ येरीकडे गोरक्षनाथ ॥ भर्तरी आणि विक्रमासहित ॥ अपार मंडळ प्रज्ञावंत ॥ गांवाबाहेर पातले ॥४५॥ तों गोरक्ष पुसे भर्तरीतें ॥ कीं राज्यवैभव अत्यदभुत ॥ यांत मानस जरी गुंडाळत ॥ असेल तरी मज सांग ॥४६॥ ऐसी ऐकोनि गोरक्षवार्ता ॥ भर्तरी बोले प्रांजळ अर्था ॥ हे महाराजा वैभव नलगे चित्ता ॥ योग आचरुं वाटतसे ॥४७॥ राज्यवैभव कनककामिनी ॥ वाटले नीच वमनाहुनी ॥ लक्ष लावोनी श्रीगुरुचरणीं ॥ प्रचीत घेऊनि वहिवाटला ॥४८॥ मग आपुली शैली शिंगी कंथा ॥ झाला देता राया यशवंता ॥ भिक्षाझोळी घेऊनि हाता ॥ कुबडी फावडी ओपीतसे ॥४९॥ ऐसिया सरंजामेंकरुन ॥ रायासी बोलता झाला वचन ॥ वैभव मानसीं वमनासमान ॥ तरी प्रचीत दावी कां ॥१५०॥ तरी संचरोनि अंतःपुरांत ॥ कामिनी तुझ्या द्वादश शत ॥ त्या परक्या मानूनि चित्तांत ॥ भिक्षा मागूनि येईं मम दृष्टी ॥५१॥ ऐसें ऐकोनि भर्तरीनाथ ॥ अवश्य म्हणे काय आहे यांत ॥ मग तैसाचि उठूनि कृतांतवत ॥ अंतःपुरांत संचरला ॥५२॥ आदेश लक्ष निरंजन ॥ शब्द गाजवी सवालपण ॥ शिंगी सारंगी वाजवोन ॥ स्त्रियांचे सदनीं फिरतसे ॥५३॥ तों तें आधींच स्त्रीकटक ॥ बैसलें होतें करीत शोक ॥ त्याउपरी पाहुनि रायाचें मुख ॥ आक्रंदती अट्टहास्यें ॥५४॥ एक धरणीवरी लोळती ॥ एक कबरीकेश तोडिती ॥ एक मृत्तिका मुखीं घालिती ॥ मस्तक आपटिती धरणीये ॥५५॥ महीं आपटूनि कपाळ ॥ रुधिरें व्यक्त करिती बंबाळ ॥ एक उभयहस्तें वक्षःस्थळ ॥ धबधबां पिटिती पैं ॥५६॥ एक रडती एक पडती ॥ एक शोकें मूर्च्छित होती ॥ परिचारिका धांवोनि हस्तीं ॥ सावध करिती तयांतें ॥५७॥ एक म्हणे या रायासमान ॥ उपरी न देखों शतजन्म ॥ अहा रायाचें मायिक धन ॥ मायेहूनि आगळिक ॥५८॥ एक म्हणती अहा राव ॥ कैसा मिटला आमुचा भाव ॥ अहा विधात्या आमुचें दैव ॥ कैसे रेखिलें निजभाळा ॥५९॥ जैं वत्सालागीं गाय ॥ एक घडी न टाकूनि जाय ॥ त्याचि नीतीं तो पतिराय ॥ होय माय आमुचा ॥१६०॥ अगे स्नेहेकरुन एकशयनीं ॥ परमस्नेहाच चांगुलपणीं ॥ किंचित कोमाइलेपहात वदनीं ॥ अर्थ पुसे तयाचा ॥६१॥ पुसे परी इष्टार्थासमान ॥ राव पूर्ण करी स्नेहेंकरुन ॥ जैसी माय करी कन्येकारण ॥ तैसा लळा फळीतसे ॥६२॥ ऐसी माया जयाचे चित्तीं ॥ तो आतां होऊनि निष्ठुमती ॥ कैसा जातसे अदृश्य क्षितीं ॥ आम्हां शव करुनियां ॥६३॥ तरी आता अर्थहीन ॥ राया जातात आमुचे प्राण ॥ आम्हां निढळवाणी करुन ॥ अधोर रानीं सोडिसी ॥६४॥ ऐसें म्हणोनि आरंबळती ॥ उलथोनि महीवरती पडती ॥ पुन्हा उठोनि रायासी पाहती ॥ दैन्यवाणी शरीरें ॥६५॥ मग म्हणती अहा जी राव ॥ मिरवत होतासी कैसा भाव ॥ कीं महीलागीं कामदेव ॥ अवतार दुसरा दिसतसे ॥६६॥ अहो राजाचे वैभववर्णन ॥ ठेंगणा वाटतसे सहस्त्रनयन ॥ तो कुशशरीर दैन्यवाणा ॥ भिक्षा मागें घरोघरीं ॥६७॥ ऐसें बोलूनि पहात त्यातें ॥ पुन्हा सांडिती शरीरातें ॥ मग सकळ उठोनि रायातें ॥ वेष्टन घातलें स्त्रियांनीं ॥६८॥ म्हणती राया आम्हां सांडून ॥ दुर देशीं नको करुं गमन ॥ येथेंचि पाहूनि चंद्रवदन ॥ तुष्ट होतों आम्हीं कीं ॥६९॥ तरी आतां निःस्पृह निराश ॥ दाही दिशा पडल्या राया उदास ॥ तरी मुक्त करुनि आमुच्या प्राणांस ॥ पाऊल मग पुढें ठेवावें ॥१७०॥ ऐसें बोलतां राया मनीं ॥ संचरला त्र्कोधद्विमूर्धनी ॥ मग कुबडी उगारोनी ॥ निघता झाला माघारा ॥७१॥ परी तो गोरक्ष गुप्तहेर ॥ पा त होता चमत्कार ॥ राव निघतां त्यजूनि स्त्रिया सत्वर ॥ मान तुकावी गोरक्ष ॥७२॥ असो भर्तरी सहजस्थितीं ॥ निघतां मागे त्या युवती ॥ आरंबळोनि पाठी येती ॥ नको जाऊं म्हणोनियां ॥७३॥ आज द्वादश वर्षेपर्यंत ॥ बैसला होतासी स्मशानांत ॥ आतां जोग आचरण करुनि वनांत ॥ तैसाचि येथें राहें कां ॥७४॥ परी तो राव सकळ सांडोन ॥ गांवाबाहेर आला परतोन ॥ येरीकडे विक्रम उज्जयिनीं ॥ स्त्रिया गेल्या स्वस्थाना ॥७५॥ यापरी गोरक्ष भर्तरीनाथ ॥ पुसोनि निघाले विक्रमातें ॥ मग पदीं पदीं दुरवा होत ॥ अर्धकोस पैं गेले ॥७६॥ येरीकडे विक्रम नृपती ॥ परतोनि आला स्थानाप्रती ॥ परी अट्टहास्य पाहूनि अंतःपुराप्रती ॥ संचार करिता पैं झाला ॥७७॥ मग माय बहिणी कन्यासमान ॥ सकळां तोषवी बोध करुन ॥ येरीकडे उभयजन ॥ मार्गाप्रती गमताती ॥७८॥ परी कृशशरीरी भर्तरीनाथ ॥ अशक्त पद ठेवी कंठेना पंथ ॥ मग व्यानअस्त्र भस्मचिमुटींत ॥ स्थापिता झाला गोरक्ष ॥७९॥ मग तें भस्म चर्चिता भाळीं ॥ झडूनि गेली अशक्त काजळी ॥ मग क्षण पातीं लागतां डोळीं ॥ गिरनारपर्वतीं पोंचला ॥१८०॥ तों जातां देखें अत्रिनंदन ॥ पायीं लोटले उभयजन ॥ मग मायें उभयतां कवळून ॥ वदन इंदु कुरवाळी ॥८१॥ म्हणे वत्सा गोरक्षनाथा ॥ भर्तरीकरितां शिणविले तूतें ॥ ऐसें म्हणोनि कुर्वाळीत ॥ वारंवार मुखातें ॥८२॥ त्याच प्रकरणीं मोहस्थिती ॥ राया भर्तरीतें संपादिती ॥ म्हणे वत्सा श्रम बहुतीं ॥ आणिलें येथें मम वत्से ॥८३॥ असो स्थिति वृत्ति धृति सकळा ॥ एकमेकांतें घोंटाळा ॥ निवेदनीं चित्तीं संचियेला ॥ तोषाप्रती तरी वरितील ॥८४॥ असो आतां तुष्ट लक्षण ॥ पुढील अध्यायीं सांगेल धुंडीनंदन ॥ मालू नरहरिकृपेंकरुन ॥ संतगणीं मिरवला ॥८५॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ नवविंशति अध्याय गोड हा ॥१८६॥ शुभं भवतु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ नवनाथभक्तिसार नवविंशतितमोध्याय समाप्त ॥

If You Like This Article, Then Please Share It