Navnath Bhaktisar Adhyay 27 | PDF Download

By Rahul | Last updated on February 1, 2026

Navnath Bhaktisar Adhyay 27 is the twenty-seventh chapter of the book. Reading it is beneficial to get the lost valuables and position of power. The PDF download link is at the end of the article.

Navnath Bhaktisar Adhyay 27:

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी जगदुद्धारा ॥ विश्वव्यापका विश्वंभरा ॥ जगसृजित्या करुणाकरा ॥ दिगंबरा आदिपुरुषा ॥१॥ पूर्णब्रह्म सनातना ॥ पंढरीअधीशा रुक्मिणीरमणा ॥ पुढें ग्रंथरचनामहिमाना ॥ बोलवीं कां महाराजा ॥२॥ मागिले अध्यायीं निरुपण ॥ भर्तरी आणि दुजा विक्रम ॥ प्रेमसागरीं भक्ति प्रेम ॥ उभय सरिता लोटल्या ॥३॥ मग ते उभयतां एक दुर्गी ॥ ग्रास रक्षिती एक प्रसंगीं ॥ तों एके दिवशीं शुभमार्गी ॥ दैव उदया पातलें ॥४॥ मोक्षपुर्यां असती सप्तम ॥ तयांतील तें अवंतिका ग्राम ॥ तेथील नृपति नरेंद्रोत्तम ॥ शुभविक्रम विराजे ॥५॥ तया जठरीं ती सूक्ष्म वेली ॥ सकळ देहीं संचार पावली ॥ पावली परिभवें परतली ॥ संभव तो न ये सांगावया ॥६॥ ऐसी कन्या असें उदरीं ॥ तीही धाकुटी बरवंटावरी ॥ कीं लवणाब्धीची लहरी ॥ मदनबाळी शोभतए ॥७॥ नाम जियेचें सुमेधावती ॥ तीक्ष्णबुद्धि असे युवती ॥ परी चंद्रकला नक्षत्रज्योती ॥ सांग स्वरुपीं मिरवतसे ॥८॥ तंव कोणे एके दिवशीं ॥ बैसली होती रायापाशीं ॥ रायें परम लालनेसी ॥ अंकावरी घेतली ॥९॥ परम सौंदर्य मुखमंडन ॥ रायें कवळुनि घेतलें चुंबन ॥ उपरी कल्पने वेधले मन ॥ वराविषयीं ॥१०॥ मग सुमति मंत्री पाचारुनी ॥ बोलता झाला शुभविक्रम वाणी ॥ म्हणे सुमेधावती मम नंदिनी ॥ उपवर ती दिसतसे ॥११॥ तरी इतुके स्वामित्वपण ॥ पुरुष योजावा दिव्यरत्न ॥ यावरी मंत्री बोले वचन ॥ राजउक्ती ऐकूनियां ॥१२॥ म्हणे महाराजा सुरतयोग ॥ जराव्यापक सर्वाग ॥ ऐसिया काळीं विषयरंग ॥ सरसावला तुम्हांतें ॥१३॥ उदरीं नाहीं वंश संतती ॥ जरा व्यापिली शरीराप्रती ॥ तरी कामना एक वेधली चित्तीं ॥ सुमेधावतीकडूनियं ॥१४॥ तरी स्वआत्मजा लावण्यराशी ॥ दावितों पहा जया वरासी ॥ त्यांते स्थापूनि राज्यासनासी ॥ करावें सुरत वैभवातें ॥१५॥ मग तो वर जामातसुत ॥ उभयपणीं या जगांत ॥ मिरवूनि जरेतें सकळ हित ॥ संगोपील तुम्हांसी ॥१६॥ तरी ऐसिये मम वचन ॥ सिद्धार्थ करा आपुलें मन ॥ तरी सुत घ्यावा कन्या देऊन ॥ पुढिलिया सुखातें ॥१७॥ ऐसें मंत्री बोलतां वचन ॥ मान तुकावी शुभविक्रम ॥ म्हणे अवश्य ऐसोंचि करणें ॥ योजिलिया अर्थातें ॥१८॥ तरी प्राज्ञिक एक यांत ॥ गोष्ट सुचली आहे मातें ॥ आधीं योजूनि अधिकारातें ॥ वरी जामात मानवावा ॥१९॥ तरी प्राज्ञिक करावें ऐसें ॥ समारंभीं गजशुंडेस ॥ माळ ओपूनि राज्यासनास ॥ स्वामित्वपणीं मिरवावें ॥२०॥ मग तो सहज ईश्वरीसत्तें ॥ लोकांत मिरवेल महीपती ॥ कन्या अर्पूनि उपरांतीं ॥ सर्वसुखा ओपावें ॥२१॥ ऐसें बोलतां शुभविक्रम नृपती ॥ तेंचि मानलें मंत्रिकाप्रतीं ॥ मग शुभमाळा मंडपक्षितीं ॥ महोत्सव मांडिला ॥२२॥ पाहूनि दिन सुदिन मास ॥ उभारिलें मंडपास ॥ गुढ्या तोरणें पताकांस ॥ राजसदन शोभलें ॥२३॥ वस्त्राभरणीं कनककोंदणीं ॥ भूमीं मिरवला कुंजर रत्नी ॥ दिव्यमाळा शुंडी ओपूनी ॥ नगरामाझारी संचरला ॥२४॥ मागें मंत्री मानव विप्रांसहित ॥ चक्षुदीक्षा करी नृपनाथ ॥ तों दिव्यकुंजर घेऊनि माळतें ॥ नगरामाजी संचरला ॥२५॥ आधीं सभामंडपीचे जन ॥ दिग्गजें सर्व विलोकून ॥ उपरी नगरामाजी गमन ॥ करिता झाला कुंजर तो ॥२६॥ मग सकळ ग्रामीचे ग्रामजन ॥ पाहती ठाई ठाई उभे राहून ॥ तों ग्राम शोधीत दुर्गी येऊन ॥ विक्रमाते विलोकी ॥२७॥ गज येऊनि दुर्गानिकट ॥ उभा राहे न चाले वाट ॥ तो दुर्गी विक्रमासह हे अष्ट ॥ सेवाधारी असती कीं ॥२८॥ गज खुंटतां पाहे नृपती ॥ खालीं पाचारी अष्टांप्रती ॥ एकामागें एक उतरती ॥ दुर्गपाययासत   विशाळ ॥२९॥ तों सर्वामागूनि उतरतां विक्रम ॥ गज आनंदोनि धावे सप्रेम ॥ कुसुममाळा ग्रीवेलागून ॥ शुंडादंडे ओपिली ॥३०॥ माळा ग्रीवे ओपितां गज ॥ वाद्ये वाजती जाहले चोज ॥ गजस्कंधीं वाहूनि राज ॥ श्रृंगारमंडपी आणिला ॥३१॥ मग ओपूनियां कनकासन ॥ निकट रायें मंत्री बैसवून ॥ परी सहज चर्चा जातीलागून ॥ कुल्लाळशब्द निघाला ॥३२॥ तेणें करुनि राव चित्तीं ॥ कांहींसा झाला साशंकित ॥ मग मंत्रिका नेऊनि एकांती ॥ कुल्लाळशब्द दर्शवी ॥३३॥ म्हणें योजिल्या अर्थाप्रती ॥ भिन्न अर्पाया सुमेधावती ॥ आम्हां क्षत्रियां कुल्लाळजाती ॥ वर्ण भिन्न दिसतो हा ॥३४॥ ऐसें बोलता शुभविक्रमराव ॥ मंत्रांही व्यापिला संशयभावें ॥ परी तो सर्वज्ञ शोधार्णव ॥ राव घेऊनि वहिवटला ॥३५॥ सवें येऊनि मंडपाबाहेर ॥ त्या अष्ट सोबत्यां बोलावूनि बाहेर ॥ निकट बैसवूनि जातीविचार ॥ पुसतां झाला तयांसी ॥३६॥ ते म्हणती नेणों कोण जाती ॥ कुल्लाळ म्हणती विक्रमाग्रतीं ॥ परी याचा शोध कुल्लाळजातीं ॥ कवणालागीं पुसवा ॥३७॥ मग तो मंत्री परस्परें ॥ कमठा पाचारुनि वागुत्तरें ॥ एकांतीं नेऊनि परम आदरें ॥ जातिवृत्तांत पुसतसे ॥३८॥ मग तों कमठ मुळापासून ॥ सांगता झाला विक्रमकथन ॥ माता क्षत्रियकुळीं सत्यवर्म ॥ मिथुळापतीची दर्शवी ॥३९॥ याउपरी पिता सुरोचन ॥ दर्शवी स्वर्गीचे गंधर्वरत्न ॥ ऐसें ऐकतां वर्तमान ॥ मंत्री तोषमान होतसे ॥४०॥ मग कमठासी नेऊनि रायासमोर ॥ तेथेंही वदविलें वागुत्तर ॥ रावही ऐकूनि तें उत्तर ॥ परम चित्तीं तोषला ॥४१॥ तोषूनी मंत्रिका पुन्हा बोलत ॥ मंत्री म्हणे कमठ घेऊनि आंत ॥ मीच जातों महाराज्यांत ॥ तरी पाचरण पाठवा सत्यवर्म्यातें ॥४२॥ अवश्य म्हणे शुभविक्रमनृपती ॥ बोळविता झाला मंत्रिकाप्रती ॥ मग कमठ आणि मंत्री सुमती ॥ मिथुळेलागीं पातले ॥४३॥ राये सत्यवर्मे ऐकून ॥ सदनीं नेलें गौरवून ॥ मग कमठ मंत्री सत्यवर्म ॥ एकांतासी बैसले ॥४४॥ ते एकांती कमठ विचार ॥ सांगता झाला सविस्तर ॥ कीं सत्यवतीचें उदेलें जठर ॥ विक्रमफळ मिरवलें ॥४५॥ तरी आतां दैवेंकरुन ॥ पौत्रा लाभलें राजचिन्ह ॥ तरी संशयद्रुम आपण चालून ॥ मुळापासूनि खुडावा ॥४६॥ ऐसी सांगूनि सकळ कथा ॥ योगक्षेमाची सांगितली वार्ता ॥ स्वर्गवास गंधर्वजामाता ॥ झाल्यासह कथियेलें ॥४७॥ रायें ऐकूनि सकळ विस्तार ॥ चित्तसरिते आनंदपूर ॥ दाटोनि पृतनेसह संभार ॥ शुभविक्रमसंगमीं मिळाला ॥४८॥ भेटून सत्यवतीतें ॥ सकळ पुसूनि वृत्तांतातें ॥ मग शुभविक्रमरायाचे चित्तीं ॥ अंतीं पांग फिटला ॥४९॥ याउपरी सुघोषमेळी ॥ विक्रम अभिषेकिला राज्यनव्हाळीं ॥ मग राज्यपदीं तयें काळीं ॥ बैसविला महाराजा ॥५०॥

छत्रचामरें माथां मिरवती ॥ तें राज्यासनीविक्रम नृपति ॥ गहिंवरोनि तोषविला प्रजापती ॥ याचकां धन वांटिलें ॥५१॥ ऐसा समारंभ झालियापाठीं ॥ मग सुमेधा अर्पिली गोरटी ॥ तोही आनंद महीपाठीं ॥ मंगलाचा भिरवला ॥५२॥ यापरी सत्यवर्म ॥ परम संस्काराचा आनंद घेऊन ॥ आपुलें राज्य विक्रमा देऊन ॥ उचित आनंद संपादीत ॥५३॥ सत्यवतीउदरींचे रत्न ॥ राज्य ओपिले तया आंदण ॥ उभयराज्यीं सार्वभौम ॥ विक्रमनृपति मिरवला ॥५४॥ असो ऐसी वहिवाट करुन निघता झाला सत्यवर्म ॥ येरीकडे राव विक्रम ॥ भर्तरीतें ओपी युवराज्या ॥५५॥ मग उभय बंधु समाधानीं ॥ राज्य करिती अवंतिकास्थानीं ॥ तों सुमंत मंत्रिका एके दिनीं ॥ अर्थ एक सूचला ॥५६॥ कीं आपुली कन्या पिंगला ॥ देऊं राया भर्तरीला ॥ मग विक्रमा पुसूनि सोहळा ॥ शुद्ध तिथि लग्नाची ॥५७॥ परी ते तेथें विक्षेप आला अवचिता ॥ कुटाळ मिळाला रजक तत्त्वतां ॥ मंत्रिका आराटूनि सांगे वार्ता ॥ शोध करा जातीचा ॥५८॥ ऐसें बोलतां रजक त्यातें ॥ पुन्हां बोलविलें कमठकुल्लाळातें ॥ त्यातें पुसतां सविस्तर तें ॥ कुल्लाळ म्हणे श्रुत नाहीं ॥५९॥ मग सत्यवतीतें विचारीत ॥ भर्तरी तुमचा कैसा सुत ॥ तीही म्हणे उदरव्यक्त ॥ भर्तरी नव्हे माझा कीं ॥६०॥ ऐसी ऐकूनि तयाची उक्ती ॥ विक्रमा विचारी मंत्री सुमती ॥ तोही म्हणे नेणों जाती ॥ बंधु मानिला भावार्थे ॥६१॥ ऐसें बोलतां राव विक्रम ॥ संशयीं पडला मंत्री सुगम ॥ मग भर्तरीस पुसता झाला वर्म ॥ प्रांजळ सांगे भर्तरी ॥६२॥ मित्रावरुणीरेतापासून ॥ वनांतरीं वाढलों हरिणीपासून ॥ भाटसंगतीं व्यवसायादि करुन ॥ सकळ कथन निरुपिलें ॥६३॥ परी मंत्रिका न पडे विश्वास ॥ चित्तीं म्हणे स्वकार्यास ॥ ऐसें भाषण करीतसे विशेष ॥ सत्य केवीं मानावें ॥६४॥ तरी आतां असो कैसें ॥ हा म्हणवितो मित्रपिता आम्हांस ॥ तरी याचे हस्तें मित्रावरुणीस ॥ कार्यालागीं पाचारावें ॥६५॥ ऐसें मंत्री चित्तीं योजूनी ॥ म्हणे तुमचा पिता मित्रावरुणी ॥ तरी स्वमंगलातें बोलावूनी ॥ आम्हां दृष्टीं दाखवा ॥६६॥ भर्तरी असे तुमची माता ॥ तरी ती झाली विगलिता ॥ परी लग्नविधातें आपुला पिता ॥ सोहळा घेऊनि पाचारा ॥६७॥ ऐसें बोलतां मंत्री त्यातें ॥ म्हणे अघटित काय यातें ॥ मग उभा राहूनि अंगणातें ॥ ऊर्ध्वदृष्टीं करीतसे ॥६८॥ म्हणे मित्रावरुनी मम ताता ॥ हा देह असेल तव रेता ॥ तरी मज बाळाची धरुनि आस्था ॥ मंगलासी येई कां ॥६९॥ ऐसे बोलूनि दीर्घवाणीं ॥ घ्यान करीतसे आपुलें मनीं ॥ हें जाणवलें अंतःकरणीं ॥ मित्रावरुणीच्या तेधवां ॥७०॥ मग वातचक्रीं आगमन ॥ अवंतीनगरीं स्वतां येऊन ॥ बोलता झाला मंत्रिकालागून ॥ शुभविक्रम रायाच्या ॥७१॥ म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती ॥ सकळ संशयाची सांडी भ्रांती ॥ मम सुता विवाहाप्रती ॥ कन्यादान ओपी कां ॥७२॥ म्हणसील जरी मंगळा निक ॥ वराचा सिद्ध असावा जनक ॥ तरी पुष्पवृष्टि मंगळघोष ॥ सुरवरां हातीं करवीन ॥७३॥ याउपरी राया विक्रमाच्या तातातें । सुरोचन गंधर्वा पाठवीन येथें ॥ सकळ संशय सांडूनि त्वरितें ॥ सुखें द्यावी पिंगला ॥७४॥ म्यां जरी यावें मृत्युभूमीं ॥ तरी दाहतील बहुत प्राणी ॥ तस्मात् सकळ संशय सोडोनी ॥ पिंगला अर्पी मम सुता ॥७५॥ ऐसें तन्मुखींचें ऐकूनि वचन ॥ परितोषलें मंत्रिकाचें मन ॥ सकळ संशयातें सांडून ॥ लग्नसोहळा मांडिला ॥७६॥ मग नेमिल्या तिथीस सीमांतपूजन ॥ ते संधींत उतरला गंधर्व सुरोचन ॥ स्वकांता सत्यवतीसी भेटून ॥ विक्रमांते पाचारी ॥७७॥ विक्रम येऊनि त्वरितात्वरित ॥ तातचरणीं माथा ठेवोत ॥ मग बोलावूनि सुमंत्रिकातें ॥ सुरोचनातें भेटवी ॥७८॥ असो सुरोचन गंधर्वपती ॥ दिव्यतेजे पाहूनि क्षितीं ॥ अतिनम्र होऊनि चित्तीं ॥ निकट बैसे गंधर्वी ॥७९॥ निकट बैसतां सुरोचन ॥ म्हणे सुमति तूं दैववान ॥ प्रत्यक्ष धृमीनारायण ॥ सोयरा केला जामात ॥८०॥ अरे भर्तरीपुत्र अवतारदक्ष ॥ मित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्ष ॥ तुवां जामात केला प्रत्यक्ष ॥ सकळ दैवां मिरवला ॥८१॥ ऐसें बोलतां सुरोचन ॥ पुन्हां वंदिता झाला चरण ॥ म्हणे मम भाग्य खरें उत्तम ॥ सोयरे झाले देव कीं ॥८२॥ तरी मी एक अर्थाअर्थी ॥ दैववान असें त्रिजगतीं ॥ तरी चलावें मंडपाप्रती ॥ करुं सीमांतपूजना ॥८३॥ अवश्य म्हणोनि सुरोचन ॥ मानववेषीं मंडपीं येऊन ॥ समारंभें करिती सीमांत पूजन ॥ करुनि विधि उरकिला ॥८४॥ वधूवरांतें आशीर्वाद देतां ॥ कुसुमें वर्षती स्वर्गदेवता ॥ अष्टके झालिया करतलहस्ता ॥ टाळी पिटिती आनंदें ॥८५॥ मग नाना वाद्यांचा गजर ॥ तेणें कोंदलें सकळ अंबर ॥ स्वर्गी गर्जती जयजयकार ॥ सुरवर विमानी बैसूनियां ॥८६॥ असो पांच दिवस उत्तम सोहळा ॥ नाना रत्नरंगमाळा ॥ सकळ तोषवूनि वर्हायळपाळा ॥ बोळविलें सुमतीनें ॥८७॥ याचकांसी अपार धन ॥ रायें बोळविलें देऊन ॥ एक मास गंधर्व सुरोचन ॥ तया ठायीं राहिला ॥८८॥ वरपिता मिरवला सुरोचन ॥ वरमाय सत्यवतीरत्न ॥ असो सकळां पुत्रसोहळामान ॥ सुमतीनें ओपिला ॥८९॥ यापरी एक मासाची अरुती ॥ सुरोचन तोषविला सहसत्यवती ॥ मग विचारुनि शुभविक्रमरायाप्रती ॥ स्वस्थानासी पैं गेला ॥९०॥ येरीकडे अवंतिकेंत ॥ दिवसेंदिवस लोटले बहुत ॥ पिंगला नामें स्वरुपवंत ॥ ऋतकाळ पावली ॥९१॥ मग उभयतां एकपणें ॥ सदा विचरती संतोषमनें ॥ याउपरी भर्तरीनें लग्नें केली अमूप ॥९२॥ द्वादश शत कामिनी करोनि ॥ सदा विचरे भोगासनीं ॥ परी मुख्य दारा पिंगला नामीं ॥ पट्टराणी मिरवत ॥९३॥ जैसा नवलक्ष नक्षत्रांत ॥ तेजें मिरवे नक्षत्रनाथ ॥ तेवीं द्वादश शतांत ॥ पिंगला नामें मिरवतसे ॥९४॥ असो युवराज्याच्या मंडणीं ॥ भर्तरी राणा मिरवे भूषणीं ॥ परी तयासमीप हिरकणी ॥ पिंगला मिरवे वैडूर्या ॥९५॥ कीं अर्का शोभवी रश्मिकिरण ॥ कीं घृतीं शर्करा दावी गोडपण ॥ तेवीं भर्तरी पिंगलारत्न ॥ स्वस्वरुपीं मिरवतसे ॥९६॥ ऐसें उभयतांचें एकचित्त ॥ कीं लोह मिळालें चुंबकांत ॥ कीं कर्दम उदकातें ॥ कदाकाळीं सांडीना ॥९७॥ सभामंडपीं राय असतां ॥ परी पिंगलेस वदे सदा चित्ता ॥ रायासही न गमे तीतें पाहतां ॥ घडोघडी पाहतसे ॥९८॥ पाहूनियां पिंगलेचें वदन ॥ मग राया सुचे कारभार पूर्ण ॥ जैसें अमालिया पूर्ण ॥ अमल सर्वदा पाहिजे ॥९९॥ तन्न्यायें उभयतांशीं ॥ ऐक्यप्रीति वर्ते प्रपंचासी ॥ ऐसें लोटतां बहुत दिवसीं ॥ वय अर्धे पातलें ॥१००॥

तों एके दिवशीं पारधीलागूनी ॥ राव जातसे घोर विपिनीं ॥ तों वरुनि पाहे मित्रावरुणी ॥ पुत्रचंद्र दृष्टीनें ॥१॥ पाहतां विचारी मनांत ॥ कीं मम वीर्याचे उदेले सुत ॥ एक अगस्ती दुसरा भर्तरीनाथ ॥ मृत्युभूमी कारणें ॥२॥ परी त्यांत अगस्तीनें हित केलें ॥ चपळपणानें स्वयंभ वरिले ॥ परी भर्तरीचें मन गुंतले ॥ राज्यवैभवाकारणें ॥३॥ तरी अहिताचा विषयप्याला ॥ राया भर्तरीस गाड वाटला ॥ हितालागीं सर्वस्वीं चुकला ॥ अचलपद तोचि राया ॥४॥ तरी हा विषयपदापासून ॥ कैसा सुटेल स्वबुद्धीनें ॥ याचें हित याजकारणें ॥ प्राप्त कैसें होईल कीं ॥५॥ नवनाथांतील अवतार ॥ धृमीनारायण महाथोर ॥ परी वेष्टिला विषयतिमिर ॥ सुटेल कैसा कळेना ॥६॥ ऐसा मोह उपजोनि पोटीं ॥ उतरता झाला महीतळवटीं ॥ अनुसूयात्मजाची घेऊनि भेटी ॥ वर्तमान निवेदिलें ॥७॥ म्हणे महाराजा योगद्रुमा ॥ काम वेधला आहे आम्हां ॥ तरी त्या कामाची सत्यभावना ॥ ऐकूनि घेईं महाराजा ॥८॥ तुम्ही विजयप्रतापध्वज ॥ मिरवलां महीं तेजःपुंज ॥ तरी मिरवला मम आत्मज ॥ मच्छिंद्रासम भर्तरी ॥९॥ तूं रायपंथ मिरवून ॥ सच्छिष्य मिरवले जगांत रत्न ॥ ते चित्तीं मम नंदन ॥ प्रविष्ट करीं याचि जागीं ॥११०॥ यावरी बोले अनुसूयासुत ॥ चिंता न करीं भर्तरीनाथ ॥ माझे प्रसादे जाण सत्य ॥ जगामाजी मिरवेल ॥११॥ मिरवेल परी कैसे रीतीं ॥ चिरंजीव शोभे महीवरती ॥ यावत् मही तावत् जती ॥ भर्तरीनाथ मिरवेल ॥१२॥ हें पूर्वीच भविष्योत्तर ॥ आहे समर्था मम गोचर ॥ दिधलें उत्तर केलें वागुत्तर ॥ मम वचनीं सर्वथा ॥१३॥ तरी आतां संशयासीं न रहावें ॥ आतां स्वस्थचित्त असावें ॥ मी यत्न करुनि भर्तरीराव ॥ नाथपंथीं मिरवीन ॥१४॥ ऐसें बोलूनि अत्रिनंदन ॥ बोळविला मित्रावरुण ॥ आपण तेचि घडी कृपा करुन ॥ भर्तरीपासीं जातसें ॥१५॥ तों येरीकडे भर्तरी नृपती ॥ पारधीस्तव काननाप्रती ॥ मृगयेकरितां हिंडे निगुती ॥ नाना वनें उपवनादि ॥१६॥ सवें सेना अपरिमित ॥ विपिनीं विस्तारली कृतांतवत ॥ चवदा लक्ष वाताकृत ॥ वाजी फिरती विपिनीं ते ॥१७॥ हेमतगटीं शृंगारासहित ॥ पाखरा झालरी शोभती मुक्त ॥ अलंकारें कोंदणयुक्त ॥ रत्नें मिरवी नवविध ॥१८॥ तरी ते शृंगार म्हणा वाचे ॥ कीं मोहर उजाळें नक्षत्रांचें ॥ तेवीं रत्नें चमकपणाचे ॥ भाव दाखविती नक्षत्रांचे पै ॥१९॥ अहो ते हय न म्हणूं वाचे ॥ रत्न उदेले उदधिउदराचें ॥ तेणे इंदिरा हर्षोनि नाचे ॥ बंधू म्हणोनि शृंगारी ॥१२०॥ त्याचि नीतिं एक लक्ष ॥ दिनसमान गज प्रत्यक्ष ॥ विशाळ शुंडादंड सुलक्ष ॥ चंद्रतेज मिरवले ॥२१॥ मिरवले परी कैसे भावें ॥ इंदूस मानलें बंधुभावें ॥ म्हणोनि सर्व पूर्ण स्वभावें ॥ चमत्कार दावीतसे ॥२२॥ त्याही दंती शुद्धकोंदणीं ॥ चुडे मिरवती हाटकखाणी ॥ त्यांत हिरे नक्षत्रें आणोनी ॥ इंदुराज मिरवितसे ॥२३॥ आणि स्वतां तोचि मुक्तासंपत्ती ॥ वरदबाळ ओपित्याप्रती ॥ झालरी अग्रगण्य निगुतीं ॥ एकसारा अर्चियेल्या ॥२४॥ चांदवे अंबारी कोंदणयुक्त ॥ नवरत्नादि सगुण मुक्त ॥ कळसतेजीं लावूनि आदित्य ॥ म्हणती विसावा घेई कां ॥२५॥ आणि रायासमान पंचशत ॥ राजविनवणी प्रज्ञावंत ॥ सरदारनामीं भूषणभरित ॥ मूर्ती जेवीं गभस्तीच्या ॥२६॥तयां माथां कनकचीर ॥ सहज तेज छत्र चंद्राकार ॥ तयांच्या कळसदीप्तीवर ॥ भानुतेज लाजतसे ॥२७॥ रायामाथीं अर्धशत ॥ कनक अंबरीं हाटक व्यक्त ॥ पाच माणिकी मणियुक्त ॥ हेमें गुंफिल्या झालरी ॥२८॥ ऐसिया छत्रकळसउद्देशीं ॥ वैडूर्यरत्नें जडिल्या राशी ॥ पद्मरागें आदित्य मानसीं ॥ विरह करुं म्हणतसे ॥२९॥ विरह तरी केउता तरणी ॥ व्यर्थ फिरतसे अंबरभ्रमणी ॥ तरी वैडूर्यरत्नांच्या पंक्तींलागुनी ॥ येऊनि सुख भोगी कां ॥१३०॥ वनें विरहे उदास चित्तीं ॥ अस्ताचळीं जातां गभस्ती ॥ चतुर्थ प्रहरीं शिणली वृत्ती ॥ रत्नपंक्ती इच्छितसे ॥३१॥ असो आतां विरहअर्क ॥ म्हणे संपत्ती मिरवला मम बाळक ॥ तेणें तो अर्क पावूनि सुख ॥ अस्ताचळा मावळतसे ॥३२॥ असो ऐशा भाषणस्थितीं ॥ अचाट विपिनीं भर्तरी नृपती ॥ मृगया करितां वाताकृती ॥ काननांत हिंडूनिया ॥३३॥ परी समयास आला मास चैत्र ॥ पुत्रचंद्रा पहावया मित्र ॥ स्थिरावे तेणें रश्मि उलटयंत्र ॥ काननांत लखलखी ॥३४॥ तैं रश्मीचें तीव्रपण ॥ चमू हळहळी तृषेंकरुन ॥ मग राव भर्तरी मृगया सांडून ॥ उदक शोधूं धावतसे ॥३५॥ परी पंचत्रयचतुर्थीत ॥ काननविरहित योजनशत ॥ उदक न दिसे ऐसें भावीत ॥ कानन रुक्ष मिरवतसे ॥३६॥ फार व्यापिले तृषेंकरुन ॥ कोणी सोडूं पाहती प्राण ॥ कोणी हिंडोनि रानोरान ॥ लवन जीवन पहाती ॥३७॥ कोणी त्रासूनि पाला भक्षिती ॥ कोणी लघुशंका सेविती ॥ कोणी तरुच्या सावलीं क्षिती ॥ धरुनियां पडियेले ॥३८॥ ऐसी पृतना आहाळपणी ॥ व्यापिली आहे तृषेंकरुनी ॥ रावही तैसाच क्लेशें काननी ॥ पाणी पाणी म्हणतसे ॥३९॥ प्राण झाला कासावीस ॥ हदयीं न सांठवे श्वासोच्छवास ॥ मुखीं कोरड पडली विशेष ॥ जिव्हा लोटूं लागलीसे ॥१४०॥ ऐसें क्लेशाचे प्रकरणीं ॥ श्रीदत्तात्रेय काननीं ॥ गुप्तवेषें असोनी ॥ रायामागें हिंडतसे ॥४१॥ तो विपिनीं मध्यें गोंगावत ॥ काय करी अत्रिसुत ॥ मायेचें सरोवर रचूनि तेथ ॥ छंदे व्यक्त दाखवी ॥४२॥ निर्मळपणीं गंगाजळ ॥ दाटोनि पात्र उचंबळे ॥ कुमुदिनी विकासित घालूनि पाळे ॥ नांदताती सभोंवती ॥४३॥ आणि तया सरसीकांठी ॥ बहु फलित तरुदाटी ॥ अनेक पक्षी मराळकोटी ॥ पंक्तिसरी दाटल्या ॥४४॥ शीतळ छाया शीतळ जीवन ॥ सरोवर मिरवले गहिंवरपणे ॥ तये तटीं पर्णकुटी करुन ॥ अत्रिआत्मज मिरवला ॥४५॥ तों येरीकडे नृपनाथ ॥ क्लेशें हिंडतां काननांत ॥ तों सरोवर ठायीं देखोनि अकस्प्रात ॥ एकटाचि पातला ॥४६॥ परमदेखूनि गहिंवरें जीवन ॥ धांव घेतसे नृपचिद्ररत्न ॥ सरसीकांठीं जाऊन ॥ जीवन स्पर्शू टेंकला ॥४७॥ आतां स्पर्शावें ओंजळांत ॥ तों तिकडूनि उठला अत्रिसुत ॥ प्रत्योदक करें कवळूनि हात ॥ रायावरी धांवला ॥४८॥ अरे अरे वाचे म्हणून ॥ म्हणे न स्वीकारीं माझे जीवन ॥ तूं कोणाचा आहेस कोण ॥ आधीं माते सांगें की ॥४९॥ येरी पावोनि देहातें ॥ भयें दाटलां नृपनाथ ॥ कांहीं न बोले क्षितींत ॥ टकमकां पहातसे ॥१५०॥

अवधूत म्हणतसे कां रे मौन ॥ धरुनि कांहीं न बोलसी वचन ॥ माता पिता गुरु कोण ॥ तव देही मिरवले ॥५१॥ मातापिता गुरुसहित ॥ सांगूनि करीं उदकपानातें ॥ नातरी सेवितां पावसी मृत्यु ॥ जीवन येथेंचि हें राया ॥५२॥ ऐसें ऐकूनि भर्तरीनाथ ॥ पदावरी लोटला त्वरित ॥ नमूनि जन्मकथेसहित अत्रिसुता सांगितलें ॥५३॥ भर्तरीमाता पात्रसांठवणीं ॥ पिता मिरवला मित्रावरुणी ॥ ऐसें प्रकरण दत्तालागुनी ॥ मूळापासोनि सांगितलें ॥५४॥ येरी म्हणे गुरु कोण ॥ भर्तरी म्हणे नाहीं अजून ॥ ऐसें ऐकूनि अत्रिनंदन ॥ बोलता झाला तयासी ॥५५॥ म्हणे राया व्यवस्थित ॥ मिरवलासी या देहातें ॥ अद्यापि गुरु नाहीं तूतें ॥ भ्रष्टबुद्धि मिरविसी ॥५६॥ तरी तूंख पूर्वीचा परम पापिष्ठ ॥ म्हणूनि गुरु न मिळाला वरिष्ठ ॥ तरी आतां क्रियानष्ट ॥ स्पर्श न करी जळातें ॥५७॥ तुवां स्पर्श केलिया पाणी ॥ सकळ तोय जाईल आटोनी ॥ निगुरुत्वाचा विटाळ मानूनी ॥ तोय त्रासा पावेल ॥५७॥ तुवां स्पर्श केलिया पाणी ॥ सकळ तोय जाईल आटोनी ॥ निगुरुत्वाचा विटाळ मानूनी ॥ तोय त्रासा पावेल ॥५८॥ मग तोय आटल्या निगुतीं ॥ मम कोपाची पावकशेखी ॥ आसडोनि तव देहाप्रती ॥ भस्म करील क्षणार्धे ॥५९॥ ऐसें बोलतां अत्रिनंदन ॥ भर्तरी करीतसे नमन ॥ म्हणे महाराजा तृषें प्राण ॥ जात आहे माझा कीं ॥१६०॥ तरी आता अनुग्रह देऊन ॥ आपण वांचवा माझा प्राण ॥ दत्त म्हणे तव अनुग्रहास मम मन ॥ द्यावया योग्य दिसेना ॥६१॥ अरे मम अनुग्रहासाठी ॥ शिव विरिंची घालिती मिठी ॥ तरी अनुग्रहातें पूर्ण कोटी ॥ तुझे पदरीं दिसेना ॥६२॥ ऐसे भागले थोर नायक ॥ तरी नातुडे अनुग्रह दोंदिक ॥ तों तेथे तूं मशक ॥ अनुग्रह वांछिसी ॥६३॥ भर्तरी म्हणे हें तो निश्वित ॥ परी तृषेनें होतों प्राणरहित ॥ तुम्ही कृपाळु परम संत ॥ दया क्षमा पाळितां ॥६४॥ जगाचें न साहे कीचकपण ॥ त्वरेंचि हरतां दैन्याकारण ॥ तरी माझा वांचवूनि प्राण ॥ धर्मसाधन मिरवावें ॥६५॥ ऐसें ऐकतां तपोराशीं ॥ म्हणे अनुग्रह देईन तुजसी ॥ परी पूर्ण तप द्वादशवर्षी ॥ आचरावें या स्थळा ॥६६॥ त्या तपःपुण्यांशेंकरुन ॥ योग्य होसील अनुग्रहाकारण ॥ राव म्हणे सध्याचे प्राण ॥ तृषेंकरोनि जातो कीं ॥६७॥ मग द्वादश वर्षे वांचल्यावरती ॥ कैसी घडेल कृपामूर्ती ॥ दत्तात्रेय म्हणे तपापुढती ॥ संकल्पातें करावें ॥६८॥ काया वाचा चित्त मन ॥ संकल्प झालिया पुण्यवर्धन ॥ वर्धन झालिया पाजीन जीवन ॥ सकळ बाधा वो चुके ॥६९॥ येरी म्हणे महाराजा ॥ संकल्प करीन सांगितल्या चोजा ॥ परी आतां मातें उदक पाजा ॥ प्राण रक्षा माझा कीं ॥१७०॥ नाथ गुरु संकल्प करिसी ॥ कीं तपा आचरण द्वादश वरुषी ॥ परी तैसें वैभवासी ॥ पुन्हां लिप्त न व्हावें ॥७१॥ वमनासमान पाळूनि सर्व ॥ विरक्तपणाची बरवी ठेव ॥ योगामाजी नित्य बैसावें ॥ आयुष्यमर्यादापर्यत ॥७२॥ ऐसें ऐकतां राव कुंठित ॥ विचारदरीं व्यापिलें चित्त ॥ म्हणे कैसी करावी रीत ॥ प्राण कासावीत होतसे ॥७३॥ तरी तो पूर्ण प्रज्ञावंत ॥ म्हणे महाराजा हे नाथ ॥ मी प्रपंचरहणीरुप ॥ मुक्त झालों नाहीं अद्यापि ॥७४॥ परी पितृश्राद्ध पितृऋण ॥ मातेसी केलिया गयावर्जन ॥ कांते पुत्र झालिल्यावीण ॥ कांताऋण फिटेना ॥७५॥ पुत्रविवाह स्नुषामेळीं ॥ ऋणमुक्त होय शुद्धमौळी ॥ ऐसिया ऋणाची स्थावरकाजळी ॥ फिटली नाहीं महाराजा ॥७६॥ तरी द्वादश वरुषेंपर्यत ॥ प्रपंच आचरुं द्यावा मातें ॥ उपरी योजूनि पूर्ण योगातें ॥ केलिया संकल्प समान कीं ॥७७॥ ऐसे बोलता तई भूपाळ ॥ अवश्य म्हणे अनसूयाबाळ ॥ मग कमंडलू भरुनि जळ ॥ तयापासीं पैं आला ॥७८॥ उदक ओपूनि करयुग्मी ॥ संकल्प करवीं मनोधर्मीं ॥ कीं द्वादशवरुषें संकल्पनामीं ॥ पुण्ययोग आचरेन ॥७९॥ यापरी तन मन धन ॥ काया वाचा जीवित्व पूर्ण गुरुसंकल्पीं सोडूनि जीवन ॥ अनुग्रह देतसे ॥१८०॥ मौळीं ठेवूनि वरदहस्त ॥ कर्णी बीजमंत्र अर्पीत ॥ आपुला करोनि शरणागत ॥ नाम आपुले सांगतसे ॥८१॥ म्हणे वत्सा ओळख मातें ॥ मी दत्तात्रेय अत्रिसुत ॥ परी तव दैव भाग्यवंत ॥ मम कर मौळीं विराजला ॥८२॥ परी अनुग्रह होतांचि प्राप्त ॥ मायिक सरोवरासहित झाला गुप्त ॥ इतुकें केलें जया अर्थी ॥ व्यर्थ होऊं पहातसे ॥८३॥ ऐसी चिंता मानसीं बहुत ॥ करिता झाला भर्तरीनाथ ॥ म्हणे महाराजा गुरुनाथ ॥ प्राण जाऊं पाहे आतां ॥८४॥ ऐसे ऐकतां भर्तरीवचन ॥ भोगावती पाचारी अत्रिनंदन ॥ तरी ती सरिता अपार जीवन ॥ घेऊनियां धांवली ॥८५॥ सुरभीचें करुनि चिंतन ॥ मही दर्शविली देदीप्यमान ॥ नेमक सहज उपजवोनि अन्न ॥ पर्वतासमान मिरवलें ॥८६॥ मग चमूसहित नृपनाथ ॥ भोगावतीचे स्नान करीत ॥ उत्तम अन्न स्वीकारुनि समस्त ॥ दर्शन करोनि चालिले ॥८७॥पृतनेसहित तुष्टचित्तीं ॥ मृगया करुनि येत नृपती ॥ येरीकडे भोगावती ॥ तिचे स्थाना पाठविली ॥८८॥ कामधेनू स्वर्गस्थानीं ॥ पाठवोनि अदृश्य झाला मुनी ॥ येरीकडे मृगया करोनी ॥ भर्तरी गेला गांवांत ॥८९॥ तरी आतां पुढें श्रोतीं ॥ कथा स्वीकारावी सुधारससंपत्ती ॥ धुंडीसुत मालू वदेल उक्ती ॥ नरहरिप्रसादेंकरुनियां ॥१९०॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ सप्तविंशति अध्याय गोड हा ॥१९१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ सप्तविंशति अध्याय समाप्त ॥

Download Navnath Bhaktisar Adhyay 27 PDF:

Loading Viewer...

If You Like This Article, Then Please Share It

DISCLAIMER:

The information on this website is for informational purposes only. We do not guarantee the accuracy of the content.

All views expressed are personal and should not be considered professional advice. Please consult a qualified expert for guidance.

We are not responsible for any actions taken based on the information provided here.