Navnath Bhaktisar Adhyay 11 | PDF Download

By Rahul | Last updated on January 6, 2026

Navnath Bhaktisar Adhyay 11 is the eleventh chapter of the book. Reading it gives you protection from fire and helps to get rid of Griha Dosha. The PDF download link is at the end of the article.

Navnath Bhaktisar Adhyay 11:

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी इंदुशलाका ॥ मुगुटमणे सकळटिळका ॥ इंदिरापते विबुधजनका ॥ भक्तिमानसा विराजित ॥१॥ ऐसा धैर्यऔदार्यवंत ॥ पुढें बोलवी भक्तिसारग्रंथ ॥ मागिले अध्यायीं गहिनीनाथ ॥ जन्मोदय पावला ॥२॥ यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ ॥ महीचीं तीर्थे करीत ॥ हिमाचल बद्रिकेदारात ॥ भ्रमण करीत ॥ हिमाचल बद्रिकेदारात ॥ भ्रमण करीत पैं गेले ॥३॥इतुकी कथा सिंहावलोकनीं ॥ पूर्वाध्यायात कीजे श्रवणी ॥ असो गुरुशिष्य बद्रिकाश्रमीं ॥ शिवालया पातले ॥४॥ बद्धांजळी जोडोनि कर ॥ करिते झाले नमस्कार ॥ नमस्कार करुनि जयजयकार ॥ स्तुतिसंवादें आराधिलें ॥५॥ हे त्रिपुरारी शूळपाणी ॥ अपर्णावर पंचाननी ॥ रुंडमाळा चिताभस्मी ॥ दिव्यतेजभूषित तूं ॥६॥हे कामांतका दक्षतेजा ॥ भोळवट वरां देसी दानवां ॥ कैलासपते महादेवा ॥ सदाशिवा आदिमूर्ते ॥७॥ हे दिगंबरा जगजेटीं ॥ भाळीं गंगा मौळीं जटाजूटी ॥ नरकपाळ करसंपुटीं ॥ इंदुकळेतें मिरविशी ॥८॥ उरगवेष्टन कुरंगसाली ॥ व्याघ्रांबर वसनपाली ॥ गजचार्मादि मिति झाली ॥ परिधाना महाराजा ॥९॥ हे कैलासवासा उमापती ॥ दक्षजामाता आदिमूर्ती ॥ चक्रचालका मायाभगवती ॥ आम्हां दासां अससी तूं ॥१०॥ हे नीलग्रीवा आदिपीठ ॥ करुणकारा उत्तमा श्रेष्ठ ॥ स्वीकारुनि सर्व अरिष्ट ॥ सुख देसी देवांसी ॥११॥ हे भाळदृष्टित्रार्थनयनी ॥ डमरु त्रिशूळ विराजे पाणीं ॥ सदा प्रिय वृषभ वाहनीं ॥ भस्मधारणी महाराजा ॥१२॥हे स्मशानवासी वैराष्यशीळा ॥ नगजामात रक्षमाळा ॥ श्वेतवर्णा तमोगुणा आगळा ॥ वाहसी गळां राममंत्र ॥१३॥ हे सर्वाधीश विश्वपती ॥ भिक्षाटणी बहुत प्रीती ॥ जटा पिंगटा त्रिपुंड्र लल्लाटीं ॥ शुद्ध वीरगुंठी शोभतसे ॥१४॥ फरशांकुश डमरु हातीं ॥ लोप पापा पातोपातीं ॥ षडाननताता सुत गणपती ॥ विद्यालक्षणीं मिरविसी ॥१५॥ ऐसी स्तुति अपार वचनीं ॥ करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमीं ॥ स्तुति ऐकूनि प्रेमें उगमी ॥ प्रगट झाला महाराज ॥१६॥मग मच्छिंद्राचा धरुनि हस्त ॥ सप्रेम त्यातें आलिंगित ॥ निकट बैसवूनि पुसे त्यातें ॥ योगक्षेम कैसा तो ॥१७॥ गोरक्षातें घेऊनि जाळी ॥ मुख स्वकरें कुरवाळी ॥ म्हणे बा उदय येणें काळीं ॥ हरिनारायण झालासी ॥१८॥ ऐसें वदोनी आणिक वदत ॥ हें महाराज मच्छिंद्रनाथ ॥ हा तव शिवयोगें सुत ॥ तारक होईल ब्रह्मांडा ॥१९॥ म्यां पूर्वीच यातें पाहिलें होतें ॥ म्हणशील तरी कनकगिरीतें ॥ तुवां अभ्यासूनि सुतें ॥ आणिल दैवत घरातें ॥२०॥ श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत ॥ भैरव काळिका वीरांसहित ॥ पाचारितां मीही तेथ ॥ आलों होतों महाराजा ॥२१॥ तस्मात् पूर्वीची होय ओळखी ॥ म्हणवूनि गोरक्ष घेतला अंकीं ॥ परी आतां असो शेखी ॥ एक वचन ऐकिजे ॥२२॥ यातें विद्येतें अभ्यासिलें ॥ परी तपाविण विगलित ठेलें ॥ जैसें शत्रु जगत्रयीं झाले ॥ मग तें हीनत्व प्रतापा ॥२३॥ कीं जीवनाविण वृक्ष जैसा ॥ काळरुप भासे तैसा ॥ कीं तरुविण ग्राम जैसा ॥ बुभुक्षित लागतसें ॥२४॥ कीं नाकेंविण सुंदर नारी ॥ कीं विनातोय सरितापात्रीं ॥ कीं नक्षत्राविण शोभा रात्रीं ॥ कदाकाळी दिसेना ॥२५॥ तरी तपाविण लखलखीत ॥ विद्याभांडार न दिसत ॥ जैसा मानव परम क्षुधित ॥ विकळ शरीरीं मिरवतसे ॥२६॥ तरी आतां माझिया आश्रमीं ॥ तपा बैसवीं योगद्रुमी ॥ मग तपबळानें बलाढ्यगामी ॥ विद्याअस्त्रें मिरवेल हा ॥२७॥ याउपरीं मच्छिंद्रनाथ बोलत ॥ वय धाकुटें बाळ अत्यंत ॥ परी तप तीव्रक्लेशांत ॥ साहिलें जाईल कैसें जी ॥२८॥ येरु म्हणे वरदपाणी ॥ तुझ्या आहे मौळिस्थानीं ॥ तरी तपक्लेशावर कडसणी ॥ दुःख देणार नाहीं बा ॥२९॥ यापरी येथें नित्यनित्य ॥ मी समाचारीनें गोरक्षातें ॥ तूं निःसंशय सकलातें ॥ तपा गोरक्षा बैसवीं ॥३०॥ ऐसें वदतां आदिनाथ ॥ अवश्य मच्छिंद्रनंदन म्हणत ॥ उत्तम आहे ऐसें बोलत ॥ अंगिकारिता पैं झाला ॥३१॥ तेथें आमुचें काय हरलें ॥ कीं जन्मांधा चक्षू आलें ॥ कीं सदैव हरिणीतें सांभाळिले ॥ एकटपणीं पावसांत ॥३२॥तेंवी तूं आणि तुझा दास ॥ येथें आश्रमीं करितां वास ॥ तेथें वाईट काय आम्हांस ॥ चिंता माझी निरसेल ॥३३॥ ऐसी शिवातें बोलूनि वाणी ॥ परी हर्ष न माये मच्छिंद्रमनीं ॥ जें योजिलें होतें अंतःकरणीं ॥ तेचि घडूनि पैं आलें ॥३४॥ फारचि उत्तमोत्तम झालें ॥ गोरक्षासी शिवें अंगिकारिलें ॥ आतां जाईल संगोपिलें ॥ अर्थाअर्थी बहुवसें ॥३५॥ मग उत्तम वेळा उत्तम दिवस ॥ ग्रहबळ जाणूनि नक्षत्रास ॥ उत्तम तिथी उत्तम मास ॥ पाहूनि तपा बैसविला ॥३६॥ लोहाचा करुनि कंटक नीट ॥ त्या अग्रीं योजूनि चरणांगुष्ठ ॥ वामपादा देऊनि कष्ट ॥ उभा राहिला गोरक्ष तो ॥३७॥ वायुआहारीं ठेवूनि मन ॥ क्षणिक अन्न त्यजून ॥ उपरी फळपत्रीं आहार करुन ॥ क्षुधाहरण करीतसे ॥३८॥ सूर्यमंडळीं ठेवूनि दृष्टी ॥ तपो करीतसे तपोजेठी ॥ तें मच्छिंद्र पाहूनि निजदृष्टीं ॥ परम चित्तीं तोषिला ॥३९॥ मग आदिनाथा विनवोनी ॥ मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी ॥ द्वादश वर्षांचा नेम करुनी ॥ गोरक्षातें सांगितले ॥४०॥ असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी ॥ येरीकडे बद्रिकाश्रमीं ॥ रात्रंदिवस बद्रिकाशूळपाणी ॥ जवळी जाऊनि बैसला ॥४१॥ वस्यें आपण आदिनाथ ॥ गोरक्षाचें दास्य करीत ॥ मागें पुढें राहूनि अत्यंत ॥ आल्या विघ्ना निवटीतसे ॥४२॥ असो यावरी मच्छिंद्रनाथ ॥ गया प्रयाग करुनि त्वरित ॥ काशी अवंतिका मिथुळासहित ॥ मथुरा काश्मिरी पाहिली ॥४३॥ अयोध्या द्वारका महाकाळेश्वर ॥ सोमनाथ करुनि तत्पर ॥ ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर ॥ घृणेश्वर पाहिला ॥४४॥ भीमाउगमीं भीमाशंकर ॥ आंवढ्या नागनाथादि पंढरपूर ॥ करुनि चौदा पीठें थोर ॥ भगवतीची पाहिली ॥४५॥ कार्तिक शेषाद्रि मल्लिकार्जुन ॥ सरितासरोवरीं अपार स्नान ॥ घडलें करितां महीतें गमन ॥ लोटलीं वर्षे द्वादशादि ॥४६॥ सकळ तीर्थे महीची करुन ॥ शेवटीं सेतुबंधीं जाऊन ॥ रामेश्वराचे चरण वंदून ॥ स्नाना गेला अब्धीसी ॥४७॥ तों श्वेतबंधीं वायुसुत ॥ जाऊनि नमी मच्छिंद्रनाथ ॥ परी मच्छिंद्रा पाहतां मकरध्वजतात ॥ आल्हादला चित्तीं बहुत तो ॥४८॥ परमप्रीतीं लबडसवडी ॥ मच्छिंद्रहस्त धरुनि ओढी ॥ हदयीं आलिंगूनि परम आबडीं ॥ निकट बैसवी महाराजा ॥४९॥ म्हणे बा तूं योगद्रुमानें ॥ कोणीकडे केलें येणें ॥ चोवीस वर्षी तुझें दर्शन ॥ आजि झालें महाराजा ॥५०॥

कीं आळशावरी गंगा वळली ॥ कीं द्वादश वर्षे पर्वणी आली ॥ तैसी माते गोष्ट जाहली ॥ आज दर्शनें तुझ्या बा ॥५१॥ ऐसें बोलूनि वायुसुत ॥ परम मच्छिंद्राचें आतिथ्य करीत ॥ मग समय पाहूनि संतोषयुक्त ॥ मच्छिंद्रातें बोलतसें ॥५२॥ आज चोवीस संवत्सर झाले ॥ परी तुजकडे माझे चक्षु लागले ॥ कैं भेटसील म्हणोनि भुकेले ॥ पारणें फिटलें आजि तें ॥५३॥ हे महाराज योगुद्रुमा ॥ कामनीं वेधली जो आम्हां ॥ त्या सरिताप्रवाहीं हस्तवर उगमा ॥ बुडवितो मजलागीं ॥५४॥ तरी त्या कामनाजळांत ॥ तूं तारक झाला आहेसी मातें ॥ झालासी परी अद्यापपर्यंत ॥ बाहेर न काढिसी महाराजा ॥५५॥ पूर्वी मजला देऊनि वचन ॥ तुवां केलें आहे गमन ॥ परी स्त्रीराज्याचें स्थान ॥ पाहिलें तुवां नाही कीं ॥५६॥ आतां तरी धरुनि चित्तीं ॥ प्रसन्न करी कृपाभगवती ॥ मैनाकिनीची कामरती ॥ पूर्ण आहुति घेई कां ॥५७॥ आपुले वचनेंकरुनि त्याचें ॥ आणिक फल दे मम वचनाचें ॥ मग पावूनि आर्त मनीचे ॥ सुटका केव्हां होईल ॥५८॥ मी गुंतलो तिचे वचनीं ॥ कीं मच्छिंद्र पाठवीन ये भुवनीं ॥ तरी ते रतिसुखाच्या कामाश्रमीं ॥ मच्छिंद्रनाथा मिरविजे ॥५९॥ ऐसें वचन तीतें व्यक्त ॥ आहे तरी मज करां मुक्त ॥ आणि तुवांही वचन दिधलें मातें ॥ तेंही सत्य करीं आतां ॥६०॥ ऐसी ऐकूनि हनुमंतवाणी ॥ अवश्य म्हणे च्छिंद्रमुनी ॥ मग त्रिरात्र तेथें वस्ती करुनी ॥ निघते झाले उभयतां ॥६१॥ मार्गी जातां अनेक तीर्थे ॥ यथाविधि झाले सरिते ॥ मग गौडबंगाला टाकूनि त्वरितें ॥ स्त्रीराज्यांत संचरलें ॥६२॥ तंव ती सकळ स्त्रियांची स्वामिनी ॥ विराजलीसे राज्यासनीं ॥ महापुण्यांशें तपोखाणी ॥ मैनाकिनी ज्ञानकळा ॥६३॥ शृंगारमुरड उत्तमजन ॥ तेथें भोगीतसे राज्यासन ॥ गज वाजी उदधी रत्न ॥ रथ उष्ट्रादि असती पैं ॥६४॥ छडीदार चोपदार ॥ रत्नपारख हेमकार ॥ राउतपूर्ण भांडार ॥ पोतदार फरासी ॥६५॥ यंत्रधारी मंत्रधारी ॥ नानामंत्री असती कुसरी ॥ शास्त्रनिपुण कारभारी ॥ लेखकही सेवा विराजले ॥६६॥ जासुद हलकारे वकीलात ॥ करुं जाणती सकळ समंतात ॥ पायदळ अश्वराउत ॥ नसे गणित पृतनेतें ॥६७॥ कुत्तेवान चित्तेवान ॥ साकरखाणी पहिलवान ॥ दिवाणादि कपिलखान ॥ गजमस्तकीं रुढती ॥६८॥ खिस्मतगारी करणार ॥ सिकारकी बंडीदार ॥ ताशा मरफी पनवाळ थोर ॥ कुशळपणीं वाजविती ॥६९॥ गायक हेर बातमीदार ॥ खेळक प्राज्ञी निपुणतर ॥ वाद्यधारी शृंगारकर ॥ शिंपी कुल्लाल विराजले ॥७०॥ असो ऐसी राजकारणें ॥ बहुत असती कामें भिन्नें ॥ परी सकळ समुदायकानें ॥ स्त्रिया अवध्या मिरवल्या ॥७१॥ असो अवघ्या कटकांत ॥ संचरते झाले उभयतां नगरांत ॥ राजद्वारी जाऊनि त्वरित ॥ झाले दृष्टीस रायासी ॥७२॥ दृष्टीं पाहतांच अंजनीसुत ॥ स्त्रियांसी आनंद झाला बहुत ॥ बोलावूनि त्वरितात्वरित ॥ कनकासनीं बैसविलें ॥७३॥ एकासनीं मच्छिंद्रनाथ ॥ एकासनीं अंजनीसुत ॥ षोडशोपचारीं पूजूनि त्वरित ॥ बद्धांजली केली तैं ॥७४॥ म्हणे महाराजा दिव्यरथा ॥ वातनंदना अंजनीसुता ॥ द्वितीय कोण सांग आतां ॥ आगमन झालें महाराजा ॥७५॥ येरु म्हणे वो शुभाननी ॥ त्वां बैसूनि तया प्राज्ञी ॥ तरी त्या तपाच्या कामना मनीं ॥ पूर्ण करीं आतां वो ॥७६॥ मम भक्तीचे वरदावळीं ॥ कीं पुरुष लाधशील मच्छिंद्र बळी ॥ तरी तोचि हा होय येणें काळीं ॥ रतिसुखा निववावें ॥७७॥ कीं सेवेलागी उडुगणनाथ ॥ कीं अरुणासह पूर्ण आदित्य ॥ तेवीं तूतें मच्छिंद्रनाथ ॥ काम व्यक्त पुरवावया ॥७८॥ कीं शचीलागीं सहस्त्रनयनी ॥ कीं शोभला जैसा शिव अपर्णी ॥ तेवीं तूतें मच्छिंद्र्मुनी ॥ रतिसुखा हेलावें ॥७९॥ ऐसें बोलोनि वज्रशरीरी ॥ निवांत बैसला आसनावरी ॥ मग राहूनि तेथें तीन रात्रीं ॥ निघता झाला कपिराज ॥८०॥ पुन्हां श्वेतपदा येऊन ॥ करीत बैसला श्रीरामचिंतन ॥ येरीकडे मच्छिंद्रनंदन ॥ सुखामाजी हेलावे ॥८१॥ बैसूनियां कनकासनीं ॥ राज्याविलासा भोगी मुनी ॥ मुक्तमाळा ग्रांवेलागुनी ॥ हेलावती समोर ॥८२॥ हेममुद्रिका ओपूनि कर्णी ॥ हस्त विराजले कनकोंदणी ॥ भरजरी भूषणें हेमकर्णी ॥ ढाळ देती लखलखीत ॥८३॥ पुढें सेवे परिचारिका ॥ परी त्याही दारा लावण्यलतिका ॥ उर्वशीच्या सारुनि आवांका ॥ सेवेलागीं उतरल्या ॥८४॥ वडीजाई बडीदार ॥ वारंवार करिती पुकार ॥ छडीदार चोपदार ॥ दवलतजादा म्हणताती ॥८५॥ मुक्तलवगांचे तुरे माळी ॥ कस्तुरी शोभे केशर भाळीं ॥ राज्यासनीं स्त्रियामंडळी ॥ सुशोभित भंवतालीं ॥८६॥ जैसा नभांत तारांगणीं ॥ वेष्टित शोभला उडुगणस्वामी ॥ तेवीं स्त्रियांत मच्छिंद्र मुनी ॥ निजभारीं शोभला ॥८७॥ कीं देवगणीं शचीनाथ ॥ परम शोभिवंत घवघवीत ॥ तेवीं स्त्रीमंडळींत ॥ मच्छिंद्रनाथ मिरवला ॥८८॥ सदा बैसूनि एका आसनीं ॥ खेळ खेळती द्यूतकर्मी ॥ नाना विनोदून विनोदवाणी ॥ हास्य करिती गदगदां ॥८९॥ राज्यवैभवादि कारभार ॥ स्वयें करिती सारासार ॥ नानाकुशलता अपार ॥ निजदृष्टीं पाहतसे ॥९०॥ रसायनीं कविताकार ॥ वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ॥ ज्योतिष भविष्य जाणणार ॥ व्याकरणादिक मिरवले ॥९१॥ धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ ॥ कीं भिन्न पाहती प्रळयकाळ ॥ जळ तें निर्मील विशाळ ॥ उभे असती सन्मुख ॥९२॥ संगीतकार गायनप्रकारी ॥ गंधर्वसरी तानमानी कळाकुमरी ॥ औषधीक वैद्य रोगापरी ॥ परीक्षिकी मीनले ते ॥९३॥ अश्वारोहण उत्तमयुक्तीं ॥ अश्व फिरवणें वाताकृती ॥ कोकशास्त्र भाष्याकृती ॥ स्वर्गाचाराचे सकळिक ॥९४॥ नाटककळा सकळी शृंगारीत ॥ आणूनि टेंकती राजसंमत ॥ प्रसंगानुसार वाचे वदत ॥ बोलूं जाण ती चातुरी ॥९५। ऐसिया गुणांचे उत्तम भरत ॥ हेलावती राजसभेत ॥ तेणें चित्तसरितेंत ॥ आनंदतोय हेलावे ॥९६॥ तेणेंकरुनि मच्छिंद्रनाथ ॥ सुखाब्धीचा मीन तळपत ॥ ऐसे लोटले दिवस बहुत ॥ रतिसुखामाझारीं ॥९७॥ तों समयें चित्तसुखमेळीं ॥ ऋतु पावली राजबाळी ॥ ते कामरतीचे सुखवेळीं ॥ गरोदर झाली ते दारा ॥९८॥ तो गणामाजी भद्रजाती ॥ सर्वगुणी मुनी भद्रमूर्ती ॥ अंशरुपें प्रगटूनि रती ॥ देह धरिता पैं झाला ॥९९॥ रेतरक्त जेणें काळीं ॥ लोटत मासां नवांचे मेळी ॥ तदनंतर प्रसून झालिया बाळी ॥ बाळ बालार्क देखिला ॥१००॥

त्यातें भरतां द्वादश दिवस ॥ उत्तमापरी केले बारसें ॥ नाम ठेविलें त्या देहास ॥ मीननाथ म्हणवूनी ॥१॥ याउपरी याचकां देऊनि दान ॥ उचितार्थे सकळ तोषविले जन ॥ नानारत्नीं देऊनी भूषण ॥ गौरवातें मिरविलें ॥२॥ असो ऐसे संगोपनीं ॥ तीन संवत्सर तया स्थानीं ॥ लोटूनि गेलीं सुखासनी ॥ मच्छिंद्रातें भोगितां ॥३॥ यावरी आतां दुसरें कथन ॥ हस्तिनापुरीं कुरुनंदन ॥ जनमेजयाच्या वंशाकारण ॥ बृहद्रवा जन्मला ॥४॥ तो जन्मेजयापासूनि पुढती ॥ सातवा पुरुष वंशाप्रती ॥ दोन सहस्त्र सातशतीं ॥ कली गेलासे लोटूनी ॥५॥ तो बृहद्रवा राजा थोर ॥ राज्यपदी हस्तिनापूर ॥ मेळवूनि महीचे अपार विप्र ॥ सोमयाग मांडिला ॥६॥ एक वरुषें त्या क्षितीं ॥ अग्निकुंडीं पूर्णाहुती ॥ पुष्ट होऊनि दाहकमूर्ती ॥ तुष्ट शरीरीं मिरवला ॥७॥ परी शिवनेत्रींचा प्रळयाग्नी ॥ देणें दाहिले होते पंचबाणी ॥ परी तो गेला होता भक्षुनी ॥ द्विमूर्धनी महाराजा ॥८॥ तो शिवशरीरीं चेतला मदन ॥ जठरीं वाहत होता द्विमूर्धन ॥ तयामाजी जीवित्वप्राण ॥ अंतरिक्ष संचरला ॥९॥ तो अंतरिक्ष महाराज ॥ अग्निजठरामाजी विराजे ॥ तो गर्भ अति तेजःपुंज ॥ यज्ञकुंडीं सांडिला ॥११०॥ पूर्ण होतांचि यज्ञआहुती ॥ शेष प्रसाद मिरवूनी निगुती ॥ मग यज्ञकुंडी विप्राहुती ॥ रक्षा काढी बृहद्रवा ॥११॥ विप्राहातें सलील बाळतेजातें ॥ रक्षा स्पर्शतां लागे हातें ॥ दृष्टी पाहतां बाळातें ॥ मंजुळवत रुदन करी ॥१२॥ तंव तो पुरोहित ज्ञानी द्विज ॥ रायासी म्हणे महाराज ॥ यज्ञकुंडीं तेजःपुंज ॥ बाळ प्रसाद मिरविलें ॥१३॥ प्रत्योदक उचलोनि हातीं ॥ बाळ दावी रायाप्रती ॥ राव पाहोनि तेजस्थिती ॥ परम चित्तीं तोषला ॥१४॥ जैसा जलार्णव मंथन करितां ॥ त्यांत चतुर्दश रत्नें निघतां ॥ मग आनंद न माये सुरवरचित्ता ॥ तैसें झालें बृहद्रव्या ॥१५॥ कीं संजीवनींचा धरुनि अर्थ ॥ कच गेला शुक्रगृहातें ॥ साधूनि येतां संजीवनीतें ॥ शचीनाथ आनंदला ॥१६॥ कीं राम उपजतां कौसल्ये कुशीं ॥ आनंद झाला दशरथासी ॥ तेवीं पाहतां बाळमुखासी ॥ बृहद्रवा आनंदला ॥१७॥ मग पुरोहित विप्रापासुन ॥ निजकरी कवळी अग्निनंदन ॥ परम स्नेहें हदयीं धरुन ॥ घेत चुंबन बाळाचें ॥१८॥ परम उदेला आनंद पोटीं ॥ कीं चंद्रोदयींची ऐक्यभेटी ॥ मग समुद्रपात्रा तोयदाटी ॥ प्रेमलहरी उचंबळे ॥१९॥ वारंवार घेत चुंबन ॥ कीं त्यातें भासे प्रत्यक्ष मदन ॥ परी तो मदनचि व्यक्त पूर्ण ॥ शिवकायेचा प्रगटला ॥१२०॥ कीं सत्त्वगुणी विद्युल्लता ॥ पाळा मांडिला शरीरावरुता ॥ कीं पुनर्विधु प्रसन्न होतां ॥ तेज आपुलें अर्पिलें ॥२१॥ कीं संघांत अपार किरणीं ॥ महीं मिरवला हा उत्तम तरणी ॥ असो ऐसा अपार चिन्ही ॥ वर्णिता ग्रंथ वाढेल ॥२२॥ असो बृहद्रवा लवडसवडीं ॥ अंतःपुरांत जात तांतडी ॥ धर्मपत्नी संसारसांगडी ॥ निजदृष्टीं विलोकी ॥२३॥ नाम तिचें सुलोचना ॥ होय ती प्रत्यक्ष सुलोचना ॥ शुभानना ती देवांगना ॥ महीलागीं उतरली ॥२४॥ कीं प्रत्यक्ष रमा सरस्वती ॥ कीं दिव्य अपर्णेची मूर्ती ॥ उदया आली मायभगवती ॥ कुरुकुळातें तारावया ॥२५॥ जिचे पाहतां चरण ॥ गंगोदक दिसे मळिण ॥ शंतनूसारखें टाकूनि रत्न ॥ शिवमौळी विराजली ॥२६॥ तस्मात् गंगासमान हातीं ॥ देतां अपूर्व लागे गोष्टी ॥ असो तिनें बाळक देखतां दृष्टी ॥ पुसे रायातें आवडीनें ॥२७॥ म्हणे महाराजा विजयध्वजा ॥ करीं कवळिलें कवण आत्मजा ॥ मातें भासें मित्रवोजा ॥ दुसरा तरणी आहे हा ॥२८॥ येरु म्हणे वो शुभाननी ॥ यज्ञकुंडाद्विमूर्धनी ॥ प्रसादरुपें दिधलें तेणें ॥ राजस्तंभीं मिरवावया ॥२९॥ तव उदरीं जो मीनकेत ॥ मनानें वरीं आपुला सुत ॥ तयावरील सकळ हेत ॥ या बाळातें मिरवावा ॥१३०॥ तरी वंशासी मीनकेत ॥ दिव्यस्वरुपा आहे सुत ॥ तयाचा पाठिराखा निश्वित ॥ ईश्वरे हा प्रेरिला ॥३१॥ अगे हा अयोनिसंभव जाण ॥ अवतारदक्ष चिद्रत्न ॥ ज्वाळामाळी होऊनि प्रसन्न ॥ प्रसाद दिधला आपणांसी ॥३२॥ ऐसें वदतां राजभूष ॥ सुलोचना कवळी बाळकंदर्प ॥ तयाचें पाहूनि दिव्यरुप ॥ मोहदीप उजळला ॥३३॥ बाळ हदयीं कवळूनि धरितां ॥ पयोधरीं लोटली पयसरिता ॥ बाळमुखीं स्तन घालितां ॥ पयःपान स्वीकारी ॥३४॥ मग उत्तम करी बाळरीती ॥ स्नानमार्जनादि सारिती ॥ यापरी द्वादश दिनांप्रती ॥ परम सोहळा मांडियेला ॥३५॥ मेळवूनि सुवासिनी ॥ पाळणा घातला योगप्राज्ञी ॥ जालिंदर हें नाम जनीं ॥ सकळां आवडीं ठेविलें ॥३६॥ यज्ञकुंडींचा ज्वाळामाळी ॥ प्रसन्न झाला तेणें काळीं ॥ ज्वाळांत उदेला म्हणूनि सकळीं ॥ नाम जालिंदर स्थापिलें ॥३७॥ ऐशा करुनियां गजरा ॥ ग्रामांत वांटिली गोड शर्करा ॥ अपार धन याचक नरां ॥ लौकिकार्थ वांटिलें ॥३८॥ ऐशिया गजरें पूर्ण राहटी ॥ झाली बहुत दिवसां लोटी ॥ मास संवत्सर पंचवटी ॥ षट् सप्तम लोटले ॥३९॥ यापरी तो बृहद्रवा राणा ॥ अपार पाळिल्या ललना ॥ पुढें योजूनि मौंजीबंधना ॥ यज्ञोपवीत आराधी ॥१४०॥ याउपरी कोणे एके दिवसी ॥ राव विचार करी मानसीं ॥ गृहस्थाश्रमी जालिंदरासी ॥ लग्नविधी उरकाया ॥४१॥ म्हणवूनि आपला पुरोहित ॥ मंत्रि सवें देऊनि त्यातें ॥ उत्तम कुमारी शोधार्थ ॥ महीवरी प्रेरिला ॥४२॥ गुणवंत रुपवंत ॥ सुलक्षणी कुमारी पाहत ॥ मंत्री आणि पुरोहित ॥ देशावरी हिंडती ते ॥४३॥ येरीकडे जालिंदर ॥ राजांगना परम सुंदर ॥ घेऊनिया अंकावर ॥ चुंबन घेती लालसें ॥४४॥ परम स्नेहानें ऊर्ध्वदृष्टी ॥ पाहूनि बोले योगजेटी ॥ धूर्मिण मंत्री मम दृष्टीं ॥ दिसत नाहीं कां माते ॥४५॥ येरी म्हणे पाडसा ऐकें ॥ तुज स्त्री करावया जनकें ॥ पुरोहित आणि मंत्री देखें ॥ पाठविले आहेत बा ॥४६॥ येरु म्हणे स्त्री काये ॥ माता म्हणे बायकोसी म्हणावें ॥ येरु म्हणे मज दावावें ॥ बायका कैशा जननीये ॥४७॥ येरी म्हणे मजसमान ॥ बायको येईल तुजकारण ॥ जैसी मी बा त्याचसमान ॥ तुज बायको येईल कीं ॥४८॥ ऐसी सुलोचना त्यातें वदतां ॥ तो शब्द रक्षूनि आपुल्या चित्ता ॥ बाळांत येऊनि खेळतां खेळतां ॥ बाळांलागीं पुसतसे ॥४९॥ म्हणे गडे हो ऐका एकु ॥ मम तात माता करिती बायकु ॥ तीस कासयासाठीं अर्थकौतुकु ॥ करितां बायकु तें सांगा ॥१५०॥

तंव ते बोलती विचक्षण ॥ बहु शठपणीं बोलती हांसून ॥ जालिंदर बुद्धिहीन ॥ बायकोही कळेना ॥५१॥ मग ते म्हणती मूर्खा ऐक ॥ बायकु म्हणतां संसार निक ॥ विषयसुखाचें पूर्ण भातुक ॥ जगामाजी मिरवीतसे ॥५२॥ विषयसुख म्हणजे काई ॥ सांगती न ठेवता गोवाई ॥ ते ऐकूनि थरारुन जाई ॥ मनीं विचार करीतसे ॥५३॥ अगा जग हें परम अधम ॥ आचरण आचरती परम दुर्गम ॥ जें कां जगाचें उत्पत्तिस्थान ॥ तेचि रमणी रमतात ॥५४॥ तरी आपण करुं नये ऐसें ॥ याचा मनाला सबळ त्रास ॥ ऐसें रचुनि विवेकास ॥ मुलांतूनि निघाला ॥५६॥ माता बोलली मजसमान ॥ कांता मिरवतसे चिद्रत्न ॥ तरी ती कांता मज मातेसमान ॥ वेव्हारा योग्य वाटेना ॥५७॥ तरीही पूर्ण अधर्मराशी ॥ कदा न वर्तू कार्यासी ॥ मग सांडूनि ग्रामधामदारासी ॥ काननांतरीं निघाला ॥५८॥ परी ग्रामद्वारीं ग्रामरक्षक ॥ त्यांनीं जातां पाहिलें बाळक ॥ परी राजनंदन म्हणूनि धाक ॥ हटकावया अंतरले ॥५९॥ परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला ॥ हेर मागें पाठविला ॥ कोणी जाऊनि त्वरें नृपाला ॥ सांगताती तांतडीनें ॥१६०॥ हे महाराज भुवननाथ ॥ विपिनीं गेला आपुला सुत ॥ रायें ऐसा ऐकूनि वृत्तांत ॥ आला धांवत तांतडीने ॥६१॥ परी तो चपळ विलक्षण ॥ म्हणे कोणी येईल धांवोन ॥ म्हणोनि मार्गातें सोडोन ॥ महाकाननीं रिघाला ॥६२॥ तंव त्या विपिनीं तरुदाटी ॥ विशाळ जाळिया तृण अफाटी ॥ त्यांत संचरतां हेर दृष्टी ॥ चुकुर झाले पाहतां ॥६३॥ परी तो योगेंद्र चपळ बहुत ॥ जातां जातां एक पर्वत ॥ त्याची दरी धरुनि सुत ॥ उत्तरदिशे चालिला ॥६४॥ येरीकडे नृपनाथ ॥ काननीं निघाला शोध करीत ॥ परी शोध लागला दूतस्थानापर्यंत ॥ पुढें शोध लागेना ॥ ॥६५॥ पाहतां परी बहु विपिन ॥ परी जालिंदराचें न पावें दर्शन ॥ जैसा अमावस्येचा दिन ॥ चंद्रभणी लोपतसे ॥६६॥ ऐसें झालें सकळांसी ॥ निराशपणें ग्रामासी ॥ येते झाले झालिया निशी ॥ शोक करितां सकळांनीं ॥६७॥ रायासह अपार जन ॥ पाहती आपुलालें सदन ॥ परी बृहद्रवा आणि सुलोचना ॥ परम अट्टहास करिताती ॥६८॥ बाळलीला खेळ अद्भुत ॥ आठवोनि गातां रुदन करीत ॥ राव म्हणे हा अनुचित ॥ प्रसाद हातींचा पैं गेला ॥६९॥ मातें अग्नि झाला प्रसन्न ॥ अहा माझें कर्म गहन ॥ हातीचें गेले चिद्रत्न ॥ काय करुं उपाय हो ॥१७०॥ अहा बाळक माझें अर्कासमान ॥ तेजरुप वाटे मदन ॥ माता म्हणे खेळ उत्तम ॥ काय वर्णूं तयाचा ॥७१॥ ऐसा करितां अट्टहास ॥ परी आणिक सरदार बुद्धिलेश ॥ रायास सदा बोधी नानाभाष्य ॥ युक्तिप्रयुक्ती करोनियां ॥७२॥ म्हणती राया नरोत्तमा ॥ जालिंदर अयोनिसंभव ॥ तरी हा सेवितां महाकानन ॥ त्यासीं मरण नसेचि ॥७३॥ मही समुद्रवलयांकित ॥ शोध करुं आम्ही निश्वित ॥ परी केव्हां तरी तुमचा सुत ॥ तुम्हां भेटेल महाराजा ॥७४॥ तरी निःसंशयेंकरुन ॥ धैर्यअर्गळी ठेवा मन ॥ ऐशा युक्तीकरुन ॥ रायासी शांत करिताती ॥७५॥ येरीकडे जालिंदर ॥ पर्वतदरीं अतिगुहार ॥ संचरला परी महीवर ॥ काळोखी रात्र दाटली ॥७६॥ तयामाजी झालें विपरीत ॥ विपिनी वणवा लागला बहुत ॥ पुढें तें कानन अग्नि जाळीत ॥ तयापासीं पातला ॥७७॥ तंव त्या दरींत जालिंदर ॥ निद्रें व्यापिला तृण अपार ॥ तों जवळी आला वैश्वानर ॥ तृण भक्षावया कारणें ॥७८॥ तों बाळ गोमटें देखिलें दृष्टीं ॥ विस्मयो करी आपुले पोटीं ॥ हें बाळ मम उदरजेठीं ॥ उदय पावलें होतें कीं ॥७९॥ उत्तम ठाव पाहूनि यातें ॥ सांडिलें होतें म्यां गर्भातें ॥ येथें यावया कारण यातें ॥ कां पडलें न कळे हो ॥१८०॥ मग शांत होऊनि मूर्तिमंत ॥ बाळ त्वरें केला जागृत ॥ अंकीं घेऊनि पुसे त्यातें ॥ कारण काय येथें यावया ॥८१॥ येरु पाहूनि तया आदरें ॥ म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर ॥ येरु म्हणे मी वैश्वानर ॥ जननीजनक तुझा मी ॥८२॥ येरु म्हणे जननीजनक ॥ कैसे होतील हरएक ॥ मग तो मुळींहूनि कथा पावक ॥ तयालागीं सांगतसे ॥८३॥ असो आतां वैश्वानर ॥ पुढें पुढती लिहितां पर ॥ ती कथा पुढें धुंडीकुमार ॥ मालू नरहरींचा सांगे की ॥८४॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ एकादशाध्याय गोड हा ॥१८५॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥११॥ ओंव्या ॥१८५॥ ॥ नवनाथभक्तिसार एकादशाध्याय समाप्त ॥

Navnath Bhaktisar Adhyay 11 PDF Download:

Loading Viewer...

If You Like This Article, Then Please Share It

DISCLAIMER:

The information on this website is for informational purposes only. We do not guarantee the accuracy of the content.

All views expressed are personal and should not be considered professional advice. Please consult a qualified expert for guidance.

We are not responsible for any actions taken based on the information provided here.